कर्नाटकच्या व्यापाऱ्याला मलकापूर बोलावून लुटले
पाच जणावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी | बुलढाणा
बांबू खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या बहाण्याने कर्नाटकातील एका बांबू व्यापाऱ्याला मलकापूर येथे बोलावून पाच जणांच्या टोळीने मारहाण करत तब्बल १ लाख ९६ हजार रुपयांची लूट केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तिघांसह दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटक येथील बांबूू व्यापारी श्रीनिवास मूर्ती नारायणस्वामी रा. चिकबळापूर, कर्नाटक यांचा बांबू खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी आपल्या फेसबुक खात्यावर व्यवसायासंदर्भातील माहिती टाकल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने फोन करून मलकापूर येथे कमी दरात बांबू उपलब्ध असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने वारंवार संपर्क साधून त्यांना मलकापूर येथे येण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार तक्रारदार ५ मार्च रोजी आपल्या चुलत भावासह कारने मलकापूर येथे आले. आरोपींनी पाठविलेल्या लोकेशननुसार ते रेल्वे बोगद्याजवळील एका मोकळ्या जागी पोहोचले. तेथे एका व्यक्तीने त्यांना बांबूच्या गोदामाकडे घेऊन जाण्याचे सांगून निर्जन ठिकाणी नेले. त्यावेळी अचानक आणखी चार जण तेथे आले आणि सर्वांनी मिळून दोघांनाही मारहाण केली. आरोपींनी तक्रारदाराच्या गळ्यातील सुमारे १४ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन (किंमत ५६ हजार रुपये), ५०० रुपयांच्या नोटांचे दोन बंडल (१ लाख रुपये) तसेच मोबाईलद्वारे ४० हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतले. यानंतर जीवे मारण्याची धमकी देत आरोपी तेथून पसार झाले.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात निखिल संजय भोसले, प्रदीप सुरेश जैन, शाहरुख रहमान, पिंजारे यांच्यासह अन्य दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन कवलसे करीत आहेत.



