गंधारी जि.प. शाळेजवळ नाली खोदकामास सुरुवात; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला दिलासा

लोणार
गंधारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात मुसळधार पावसानंतर साचलेल्या पाण्याच्या समस्येची प्रशासनाने दखल घेत अखेर तातडीने कारवाई सुरू केली आहे. शाळेजवळील नाली खोदकामाला सुरुवात झाल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
३० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुख्य रस्त्यावरून वाहणारे पावसाचे पाणी थेट शाळेच्या परिसरात शिरल्याने संपूर्ण आवार जलमय झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
या समस्येकडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन आंधळे व उपाध्यक्ष राधेश्याम आंधळे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही न झाल्याने हा प्रश्न वृत्तपत्रातून मांडण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नाली खोदकामाचे काम हाती घेतले.
शाळा परिसरात दरवर्षी पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
सुरू झालेल्या नालीच्या कामामुळे भविष्यात पावसाचे पाणी योग्य मार्गाने वाहून जाईल आणि शाळेच्या आवारात पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. स्थानिक ग्रामस्थ, पालक आणि शालेय व्यवस्थापन समितीने प्रशासनाच्या या तातडीच्या कारवाईचे स्वागत केले असून, विद्यार्थ्यांच्या हितासाठी या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे.



