पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या सूचना; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन

लोणार

 संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या लोणार शहरातील आगमनाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या वतीने पालखी मार्गाची संयुक्त पाहणी करण्यात आली. लोणार-किनगाव जट्टू मार्गाने शहरात दाखल होणाऱ्या पालखीच्या मार्गावरील रस्त्यांची पाहणी करून खड्डे, अरुंद रस्ते आणि मुख्य बाजारपेठेतील संभाव्य वाहतूक कोंडीच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक लोणारमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. गर्दीच्या ठिकाणी वाहनांची कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस व नगरपरिषद प्रशासनाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पालखी मार्गावरील खड्डे तातडीने बुजविणे, रस्त्याच्या कडेला वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वस्तू व अतिक्रमणजन्य बाबी दूर करणे, तसेच भाविकांना सुरक्षितपणे मार्गक्रमण करता यावे यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत पाहणीदरम्यान चर्चा झाली. पालखी मुख्य धार चौकात दाखल झाल्यानंतर भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था करण्याचेही नियोजन करण्यात आले.

गर्दीच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण तसेच नागरिक, व्यापारी आणि भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. पालखी सोहळा शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे.

पाहणीदरम्यान माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक भूषण मापारी, मुख्याधिकारी आशिष बोबडे, पोलीस ठाणेदार प्रकाश सदगीर, गटनेते नितीन शिंदे, उपाध्यक्ष आबेद खान, आरोग्य सभापती उबेद भाई, नगरसेवक श्याम राऊत, सामाजिक कार्यकर्ते एजाज खान, पत्रकार गोपाल तोष्णीवाल, पवन शर्मा, रेहमान भाई, गोपनीय विभागाचे पोलीस संतोष चव्हाण, बांधकाम अभियंता शुभम कुलकर्णी, पाणीपुरवठा अभियंता महेश राठोड, योगेश साळवे यांच्यासह नगरसेवक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालखी सोहळ्यादरम्यान वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे, भाविकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना गैरसोय होऊ न देणे यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने परस्पर समन्वयाने कार्य करण्याची भूमिका यावेळी स्पष्ट केली.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!