गुरु आज्ञेचे पालन करणाऱ्यालाच अध्यात्मात यश – जगद्गुरू डॉ चंद्रशेखर शिवाचार्य

काशीच्या विश्वनाथाचे वीरशैव काशीत जंगी स्वागत

प्रतिनिधी | साखरखेर्डा
गुरुच्या मार्गदर्शनावर निष्ठा ठेवून धर्मकार्याला वाहून घेणारा शिष्यच समाजात आदर्श निर्माण करतो. गुरु आज्ञेचे प्रामाणिक पालन करणाऱ्या शिष्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही, असे प्रतिपादन काशी सिंहासनाधीश्वर परमपूज्य डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी केले.
ते, साखरखेर्डा येथील जगद्गुरू पलसिद्ध मठात अधिकमासानिमित्त आयोजित शिवमहापूराण कथा व धर्मसभेत सोमवार २५ मे रोजी बोलत होते. यावेळी शिवाचार्य रत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज, दिगंबर शिवाचार्य महाराज (थोरला मठ, वसमत), सद्गुरू सदाशिव शिवाचार्य वेराळपूरकर, सोमनाथ शास्त्री हिरेमन आदी मान्यवर उपस्थित होते. धर्मसभेपूर्वी डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांचे टाळ-मृदंगाच्या गजरात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. प्रारंभी मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी मठाच्या धार्मिक व सामाजिक कार्याचा आढावा घेताना वीरशैव लिंगायत परंपरेचा प्रचार देशभर विविध भाषांमधून होत असल्याचे सांगितले. त्यांनी शिवतत्त्वाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे नमूद केले.
पुढे बोलताना डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कार्याचा गौरव केला. अत्यंत अभ्यासू व विद्वान संत म्हणून त्यांची ओळख असल्याचे सांगत त्यांनी धर्म, साहित्य आणि संस्कृती संवर्धनासाठी मोठे योगदान दिल्याचे नमूद केले. संत साहित्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचेही त्यांनी कौतुक केले. सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी लहानपणापासून गुरूंच्या सहवासात राहून विद्या आणि संस्कार आत्मसात केले. त्यांनी धर्मप्रसाराचे कार्य निष्ठेने पुढे नेले असून, गुरु-शिष्य परंपरेचे हे प्रेरणादायी उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवमहापूराण कथा ही केवळ ऐकण्यापुरती मर्यादित नसून ती जीवनात आत्मसात करणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. इष्टलिंग पूजेविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे सांगत, विविध देवतांच्या उपासनेतही शिवतत्त्वाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
धर्मसभेत दिगंबर शिवाचार्य महाराज व सद्गुरू सदाशिव शिवाचार्य वेराळपूरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद वाकदकर यांनी केले.

गुरु-शिष्य परंपरेचा आदर्श संदेश
भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरेला विशेष महत्त्व आहे. गुरुच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान, संस्कार आणि अध्यात्म आत्मसात करणारा शिष्यच समाजात मोठे कार्य करू शकतो. सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी आपल्या गुरुंच्या शिकवणीवर चालत धर्मप्रसाराचे कार्य व्यापक केले असून, ही परंपरा आजही समाजाला प्रेरणा देणारी ठरत आहे.

अधिक मासातील शिवमहापूराणाचे महत्त्व
हिंदू धर्मात अधिक मास हा अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात शिवमहापूराण कथा, नामस्मरण, पूजा-अर्चना आणि धार्मिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व दिले जाते. शिवकथा ऐकल्याने अध्यात्मिक जागृती वाढते तसेच समाजात भक्ती, समरसता आणि सकारात्मक विचारांचा प्रसार होतो, अशी श्रद्धा आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!