पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी व ग्राम स्वराज्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

प्रतिनिधी | बुलडाणा
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ आणि जल जीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर जवळपास दोन दशकांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे मानधन अद्याप थकित आहे. ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील मानधन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समिती व राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज पासुन काम बंद आंदोलन सुरु केले आहे.
जिल्हा व तालुका स्तरावर हे कर्मचारी ग्रामपंचायतांमधील प्रत्यक्ष अंमलबजावणी, क्षेत्रीय तपासणी, लाभार्थी समन्वय, ऑनलाईन नोंदी आणि अहवाल सादरीकरण यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील नियोजन व देखरेखीची जबाबदारी पार पाडत आहेत. चार महिने मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे घरभाडे, मुलांचे शिक्षण आणि वैद्यकीय खर्च भरणे कठीण झाले आहे. तरीही ते सेवेत सतत कार्यरत आहेत. “चार महिने मानधन न मिळाल्याने आर्थिक ताण आहे, तरीही सेवा सुरू ठेवत आहोत,” असे महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने सांगितले. सेवा सुरू असताना मानधन न मिळणे केवळ आर्थिक प्रश्न नाही, तर कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे आहे. अनेक राज्यस्तरीय प्रतिनिधित्व करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने, संस्थेने न्यायासाठी आणि आवश्यक कारवाईसाठी मानवाधिकार आयोगात तक्रार नोंदविली आहे.
या आंदोलनाचा काय परिणाम होणार आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी जोपर्यंत कायम सेवक कायम कायम सेवेत शासन स्तरावरून जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत कंत्राटी कर्मचारी आंदोलन कायम राहणार आहे.
कपंनीची नियुक्ती रद्द करुन पुर्वी प्रमाणे जिल्हा परिषदेकउे नियुक्ती आदेश द्यावे, प्रलंबित मानधन शासन निर्णयाप्रमाणे अदा करावे, पहिल्या नियुक्तीपासुन ग्रॅज्युटीची रक्कम कर्मचारी यांचे मानधनातुन कपात करण्यात येते, ती व्याजासह परत करावी, पुन्हा कपात करुन नये, दरमहा १० तारखेच्या आत मानधन द्यावे, सर्व महिन्यांच्या सॅलरी शीट देण्यात यावे आदी मागण्यांसाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कंत्राटी कर्मचारी संघटनेनेही काम बंद आंदोलन सुरु केले आहे.
—-



