डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसीला स्वायत्त दर्जा; विदर्भातील चौथ्या संस्थेचा मान
डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसीच्या शैक्षणिक वाटचालीला नवे बळ

मलकापूर
मलकापूर येथील डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसीला स्वायत्त (Autonomous) महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त झाला असून, हा मान मिळविणारे हे विदर्भातील चौथे तसेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत दुसरे फार्मसी महाविद्यालय ठरले आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील गुणवत्तेला नवी ओळख मिळाली आहे.
सन २००५ मध्ये बी.फार्म. अभ्यासक्रमाने सुरू झालेल्या महाविद्यालयाने कालांतराने एम.फार्म., डी.फार्म., पीएच.डी. संशोधन केंद्र तसेच अत्याधुनिक Centre of Excellence आणि 3D Printing Lab यांसारख्या सुविधा विकसित केल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि उद्योगाभिमुख उपक्रमांमुळे संस्थेने फार्मसी शिक्षण क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केले आहे.
स्वायत्त दर्जामुळे महाविद्यालयाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम विकसित करणे, कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणे, परीक्षा व मूल्यमापन प्रणाली अधिक परिणामकारक बनविणे, तसेच मूल्यवर्धित व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. याशिवाय उद्योग, संशोधन संस्था आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांशी सहकार्य वाढविण्यासही मदत होणार आहे.
प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांनी सांगितले की, स्वायत्ततेमुळे संशोधन, नवोपक्रम, स्टार्टअप संस्कृती आणि उद्योजकता विकासाला चालना मिळेल. विद्यार्थ्यांना प्रकल्पाधारित शिक्षण, इंटर्नशिप, उद्योग प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होतील.
इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था (IBSS)चे अध्यक्ष योगेंद्र गोडे यांनी हा संपूर्ण मलकापूर, बुलढाणा जिल्हा आणि विदर्भासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत संस्थेच्या व्यवस्थापन, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले. चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पाच नामांकित औषधनिर्माण कंपन्यांमध्ये रोजगार मिळाल्याने संस्थेच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.




