घरकुल लाभार्थ्यांवर संकट; आधी हप्ता दिला, आता १०० मीटर नियमाचा आधार घेत निधी रोखला
लोणार नगर परिषदेच्या कारभाराविरोधात युवासेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

लोणार
लोणार नगर परिषदेच्या कथित विसंगत कारभारामुळे पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल योजनेतील अनेक लाभार्थ्यांसमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. नगर परिषदेने सुरुवातीला पात्र लाभार्थ्यांना मंजुरी देऊन पहिला हप्ता वितरित केला. मात्र, नंतर पुरातन वास्तूच्या १०० मीटर परिघाचा नियम पुढे करत पुढील हप्ते व मजुरी रोखल्याचा आरोप होत असून याविरोधात युवासेना तालुकाध्यक्ष गजानन मापारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.
माहितीनुसार, नगर परिषदेने आवश्यक पडताळणी करून पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी दिली होती. त्यानंतर पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. या निधीच्या आधारे अनेक कुटुंबांनी जुनी घरे पाडून नव्या घरांच्या बांधकामास सुरुवात केली. मात्र, बांधकाम अर्धवट अवस्थेत असतानाच प्रशासनाने पुरातन वास्तूच्या १०० मीटर परिघासंदर्भातील नियमाचा दाखला देत पुढील आर्थिक सहाय्य रोखल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.
यामुळे अनेकांची घरे अर्धवट राहिली असून निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. “जर १०० मीटरची अट लागू होती, तर सुरुवातीलाच मंजुरी व पहिला हप्ता कसा देण्यात आला?” असा प्रश्न लाभार्थी उपस्थित करत आहेत. तसेच काही अधिकाऱ्यांकडून “पहिला हप्ता चुकून देण्यात आला” असे सांगितले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर युवासेना तालुकाध्यक्ष गजानन मापारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तातडीने वितरित करावेत, तसेच या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणाकडे प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लाभार्थ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.




