अखेर दोघांचे झाले एकमतं…

बुलडाणा
बुलडाणा विधानसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि उबाठा गटाच्या प्रदेश प्रवक्त्या जयश्री शेळके यांचे कधीच कोणत्याच विषयावर एकमत झाले नाही. मात्र आता दोघे प्रथमच एका महत्त्वाच्या प्रशासकीय प्रश्नावर एकाच भूमिकेत आल्याचे चित्र दिसत आहे. खामगाव येथे प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मोताळा तालुक्याचा समावेश करण्यास दोन्ही नेत्यांनी विरोध दर्शविल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे.

बुलडाणा विधानसभा मतदारसंघात बुलडाणा आणि मोताळा या दोन तालुक्यांचा समावेश असून या दोन्ही तालुक्यांमध्ये संजय गायकवाड आणि जयश्री शेळके यांचा मोठा जनसंपर्क आहे. मागील विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात चुरशीची लढत झाली होती. त्या निवडणुकीत जयश्री शेळके यांच्या विजयाच्या शक्यतांची मोठी चर्चा होती. या निवडणूकीत दोन्ही नेत्यांनी साम, दाम, दंड, भेदचा वापर केला. मात्र यात आमदार संजय गायकवाड यांचा दाम व साम काम करुन गेला हे सर्वांनाच माहित आहे. परिणामी त्यांचा अत्यंत निसटता विजय झाला. त्यामुळे दोघांतील राजकीय संघर्ष कायम चर्चेचा विषय राहिला आहे.
दरम्यान, खामगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय प्रक्रियेत असून या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मोताळा तालुक्याचा समावेश करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. मात्र मोताळा तालुका बुलडाण्याऐवजी खामगावच्या प्रशासकीय कार्यक्षेत्राशी जोडल्यास भविष्यात खामगाव स्वतंत्र जिल्हा झाल्यास बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना किंवा फाळणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत विद्यमान राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन मोताळा हा आपल्या काळजाचा तुकडा आहे, तो बुलडाण्यापासून दुर करु नये, मोताळयात अजून विकास कामे बाकी असल्याचा दावा करत मोताळा तालुका बुलडाणा प्रशासकीय कार्यक्षेत्रातच कायम ठेवण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. दुसरीकडे जयश्री शेळके यांनीही विभागीय आयुक्तांकडे निवेदन देत मोताळा तालुक्याचा समावेश खामगावच्या प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नये, कारण मोताळा हा खामगाव पासून फार लांब आहे व बुलडाणा जवळ आहे, प्रत्येक कामासाठी शेतकरी व सामान्य मंडळीची फरपट होईल असा दावा करत सदर मागणी केली आहे.
राजकीय पातळीवर परस्परविरोधी भूमिका घेणारे हे दोन्ही नेते एका स्थानिक प्रश्नावर मात्र समान भूमिका घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे हा केवळ प्रशासकीय प्रश्न आहे की त्यामागे भविष्यातील राजकीय गणितेही दडली आहेत, याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.
मोताळा तालुक्याच्या प्रशासकीय आणि राजकीय भवितव्याशी संबंधित हा विषय पुढील काळात कोणते वळण घेतो, याकडे जिल्ह्यातील नागरिकांसह राजकीय निरीक्षकांचेही लक्ष लागले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!