धामणगाव बढे–रिधोरा मार्गावर वाहनाचा भीषण अपघात; तिघे गंभीर जखमी

धामणगांव बढे
,
धामणगाव बढे–रिधोरा मार्गावर मंगळवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास मालवाहू वाहनाचा भीषण अपघात झाला. वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असून, यात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, रिधोरा येथील रहिवासी सागर प्रधान यांची अल्टो कार बंद पडल्याने ती टोचन करून आणण्यासाठी धामणगाव बढे येथून एक मालवाहू वाहन रिधोराकडे निघाले होते. मात्र, रिधोरा मार्गावर सदर वाहनाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात गोपाल श्रीसागर (रा. धामणगाव बढे) सागर प्रधान (रा. रिधोरा) यांना गंभीर मार लागला आहे तर अविनाश राणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर ‘१०८’ रुग्णवाहिकेद्वारे तिन्ही जखमींना तातडीने बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या प्रकरणी पोलिसाकडून तपास केला जात आहे.




