बीव्हीजी व्यवस्थापकाच्या मनमानीविरोधात कर्मचाऱ्यांचा उद्रेक

१८ ऑगस्टपर्यंत चौकशी अहवाल द्या; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

बुलडाणा
येथील राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाह्यस्त्रोत कर्मचारी पुरविणाऱ्या बीव्हीजी इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात कर्मचाऱ्यांच्यावतीने संताप व्यक्त केला जातो आहे. कंपनीचे व्यवस्थापक संतोष बुंदे यांच्याकडून पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचे गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांकडे तक्रार करत १८ ऑगस्ट पर्यत चौकशी अहवाल देण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
सदर इशारा एका निवेदनाद्वारे शुक्रवार ७ ऑगस्ट रोजी संस्थेचे अधिष्ठाता यांच्याकडे करण्यात आला आहे. या निवेदनात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्यावतीने आरोप करण्यात आला आहे की, व्यवस्थापकाकडून कर्मचाऱ्यांच्या शारीरिक पेहरावावरून वारंवार छळ केला जात असून, कामावरून कमी करण्याच्या धमक्या दिल्या जातात. विशेषतः बाहेरगावाहून ये-जा करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक रातपाळीच्या ड्युट्या लावून त्रस्त करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी स्वतःहून नोकरी सोडावी, या उद्देशाने त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. काही महिला कर्मचाऱ्यांनी कथित छळाला कंटाळून आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुरक्षा समितीची माहिती व फलक लावण्याबाबतही तक्रारीत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. नवीन पदभरती करताना शैक्षणिक पात्रतेची योग्य तपासणी न करता आर्थिक देवाण-घेवाणीतून जागा भरल्या जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना नियमानुसार मिळणाऱ्या रजा नाकारून त्याबदल्यात पैसे घेतले जात असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, या सर्व आरोपांची सखोल चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अहवाल प्राप्त न झाल्यास १८ ऑगस्ट २०२६ रोजी कर्मचाऱ्यांसह कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तक्रारदारांनी दिला आहे.

000

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!