90 लाखांचे सोने घेऊन कुरिअर कर्मचारी फरार

पुणे

सराफ व्यावसायिकांकडून मुंबईतील शाखेत पोहोचविण्यासाठी सोपविण्यात आलेले तब्बल ९० लाख ३३ हजार रुपये किमतीचे सोने व दागिने असलेली १४ पार्सल घेऊन कुरिअर कर्मचारी बेपत्ता झाल्याची घटना पुणे-मुंबई प्रवासादरम्यान घडली. स्वारगेटहून मुंबईकडे जाणाऱ्या बसमधून वाकड पुलाजवळ उतरून संबंधित कर्मचारी पसार झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जितेंद्र सिंह यांचा ‘एसजीएलजेपी लॉजिस्टिक प्रा. लि.’ या नावाने कुरिअर व्यवसाय असून, पुण्यासह कोल्हापूर, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर येथे कंपनीच्या शाखा आहेत. ग्राहकांचे सोने व पैसे सुरक्षितपणे संबंधित ठिकाणी पोहोचविण्याचे काम कंपनीमार्फत केले जाते. चौहान हा मुंबई कार्यालयात कर्मचारी म्हणून कार्यरत होता. त्याला दरमहा १२ हजार ३०० रुपये वेतन मिळत होते.  ४ ऑगस्ट रोजी विविध ठिकाणांहून पुण्यात आलेल्या १४ पार्सलमध्ये सोन्याची बिस्किटे आणि दागिने होते. यामध्ये कोल्हापूर येथील सहा, पुण्यातील पाच, तर जळगाव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथून प्रत्येकी एक पार्सल असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही सर्व पार्सल घेऊन चौहान ५ ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकातून मंत्रालयाच्या बसने मुंबईकडे रवाना झाला. बस सकाळी नऊ वाजता मुंबईत पोहोचली; मात्र चौहान मुंबईत पोहोचलाच नसल्याचे निदर्शनास आले. त्याचा मोबाइलही बंद असल्याने कंपनीकडून त्याचा शोध घेण्यात आला. बस वाहकाशी संपर्क साधल्यानंतर चौहान वाकड पुलाजवळ बसमधून उतरल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तो कुठे गेला, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून, एवढ्या मोठ्या किमतीचे सोने व दागिने घेऊन कर्मचारी अचानक गायब झाल्याने सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी जितेंद्र ऋषिकेश सिंह यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी विशाल सत्यपाल चौहान (वय २०, सध्या रा. मुंबई, मूळ रा. नरोरा, जि. एटा, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!