जिल्ह्याचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करा ; आ. श्वेता महाले यांची मागणी

मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश

प्रतिनिधी | बुलडाणा
राजमाता जिजाऊंची जन्मभूमी असलेल्या सिंदखेडराजामुळे ऐतिहासिक ओळख लाभलेल्या बुलडाणा जिल्ह्याचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्यात यावे, अशी मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेत प्रशासनाला योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने नामकरणाचा विषय आता प्रशासकीय पातळीवर चर्चेत आला आहे.
राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीचा सन्मान आणि त्यांच्या ऐतिहासिक योगदानाला कायमस्वरूपी अभिवादन म्हणून जिल्ह्याला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी भूमिका आमदार महाले यांनी मांडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण आणि स्वराज्याच्या संकल्पनेला आकार देण्यात जिजाऊंचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीच्या जिल्ह्याला ‘राजमाता जिजाऊनगर’ हे नाव मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारशाकडे वेधले लक्ष
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात बुलढाणा जिल्ह्याची ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनविषयक वैशिष्ट्येही अधोरेखित करण्यात आली आहेत. सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ, जागतिक महत्त्वाचे लोणार सरोवर, शेगावचे संत गजानन महाराज मंदिर, मेहकरचे श्री शारंगधर बालाजी मंदिर तसेच ज्ञानगंगा अभयारण्य यांसह जिल्ह्यातील विविध पर्यटन व धार्मिक स्थळांचा उल्लेख करण्यात आला आहे.

नामकरणाचा विषय आता प्रशासकीय पातळीवर
आमदार श्वेता महाले यांच्या मागणीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेत प्रशासनाला आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ‘राजमाता जिजाऊनगर’ या नामकरणाच्या मागणीला प्रशासकीय प्रक्रियेच्या दृष्टीने पुढील दिशा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अंतिम नामकरणासाठी शासनाची निर्धारित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक राहणार आहे.
00

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!