अकोला जिल्ह्यातील खुनाला बुलडाणा कनेक्शन!
नऊ तासांत पाच आरोपी अटकेत

अकोला
जिल्हयातील निंबी मालोकार येथील शेतशिवारात शेतातील रस्त्याच्या वादातून अमोल गजानन मालोकार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना ९ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. या हत्याकांडाचा अवघ्या नऊ तासांत उलगडा करण्यात अकोला स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आरोपींचे धागेदोरे बुलडाणा जिल्ह्यापर्यंत पोहोचले असून, दोघांना देऊळगाव राजा परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, अमोल मालोकार हे शेतात असताना त्यांच्या चुलत भावांसह काही जणांशी शेतातील रस्त्याच्या कारणावरून वाद झाला. याच वादाचे रूपांतर गोळीबारात झाले. आरोपींनी अमोल यांच्यावर बंदुकीतून गोळीबार करून घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती त्यांचे भाऊ उमेश गजानन मालोकार यांनी पोलिसांना दिली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, जुने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पितांबर जाधव आणि बाळापूरचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला सुरुवात केली.
पोलिसांच्या तपासात हत्याकांडाबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर आली. पहिल्या गोळीबारात अमोल मालोकार जखमी झाल्याचे आरोपींना समजल्यानंतर ते पुन्हा घटनास्थळी आले. यावेळी ज्ञानेश्वर मालोकार यांच्या उपस्थितीत अमोल यांच्यावर पुन्हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
तीन पथकांनी सुरू केली शोधमोहीम
आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या. त्यानंतर तीन पथके तयार करून विविध दिशेने शोधमोहीम राबविण्यात आली. तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे पोलिसांनी विजय मालोकार, विजय बुटे आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला उमरी परिसरातून ताब्यात घेतले. याचदरम्यान अजय श्रीकृष्ण मालोकार आणि राजकुमार शिवचरण मालोकार हे वाहनातून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार एक पथक त्यांच्या मागावर रवाना झाले. वाहनाचा पाठलाग करत पोलिसांनी दोघांनाही बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे मध्यरात्री ताब्यात घेतले. यामुळे अकोला जिल्ह्यातील या हत्याकांडाला बुलडाणा कनेक्शन असल्याचे समोर आले.
वाहने, मोबाईल आणि रोकड जप्त
दरम्यान यावेळी विजय श्रीकृष्ण मालोकार (३३), अजय श्रीकृष्ण मालोकार (३२), राजकुमार शिवचरण मालोकार (२५), विजय कैलास बुटे (३०) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक स्विफ्ट डिझायर, एक एटिंगा, एक बुलेट मोटारसायकल, पाच मोबाईल फोन आणि १ लाख ७ हजार ७६० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी बाळापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.




