सुरेश देवकर यांच्या रुपाने शिक्षकांचा आवाज बुलंद करा

कपिल पाटील यांचे आवाहन : शिक्षक भारतीचे उमेदवार सुरेश देवकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 

 

अमरावती 

विधान परिषदेत शिक्षकांच्या प्रश्नांना आक्रमकपणे वाचा फोडणारा आणि त्यांच्या हक्कांसाठी ठाम भूमिका घेणारा प्रतिनिधी आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत शिक्षकांचा आवाज अपेक्षेइतका प्रभावीपणे सभागृहात उमटला नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीचे उमेदवार सुरेश देवकर यांना विजयी करून शिक्षकांचा आवाज विधान परिषदेत पोहोचवा, असे आवाहन शिक्षक भारतीचे नेते तथा माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केले.

शिक्षक भारतीचे अमरावती शिक्षक मतदारसंघातील उमेदवार सुरेश गिताबाई बाबुराव देवकर यांनी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित नामांकन मेळाव्यात कपिल पाटील बोलत होते.

यावेळी शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, संदीप तडस यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, विधान परिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार असतानाही अनेक वेळा शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रभावी आवाज उठताना दिसत नाही. गरिबांच्या शिक्षणाच्या बाजूने उभे राहण्याची बांधिलकी असलेला प्रतिनिधी सभागृहात जाणे गरजेचे आहे. जाती-धर्माच्या अस्मितेपेक्षा सामान्य आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी लढण्याची भूमिका महत्त्वाची आहे. विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी बी. टी. देशमुख यांनी सभागृहात एकाकी असतानाही प्रभावीपणे भूमिका मांडली. त्याच लढाऊ परंपरेची आज गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

देवकरांच्या प्रचारफलकावर सावित्रीबाई, फातिमा शेख

निवडणूक प्रचाराच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना कपिल पाटील यांनी उमेदवारांच्या प्रचारफलकांचा उल्लेख केला. अमरावती शहरात विविध उमेदवारांचे फलक पाहिले; मात्र त्यावर शिक्षण क्षेत्रातील प्रेरणास्थान असलेल्या सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांचे छायाचित्र फारसे दिसत नाही. सुरेश देवकर यांच्या फलकावर मात्र दोन्ही समाजसुधारकांचे छायाचित्र ठळकपणे लावण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

देवकर विजयी झाल्यास ताराबाई शिंदे यांच्या स्मारकासाठीही प्रयत्न करण्यात येतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

‘२३ ऑक्टोबरला परिवर्तनासाठी मतदान करा’

शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले. २३ ऑक्टोबरच्या मतदानाच्या दिवशी आज व्यक्त केलेला निर्धार कृतीत उतरवावा. प्रत्येक कार्यकर्त्याने किमान तीन शिक्षकांना मतदानासाठी सोबत आणण्याचा संकल्प करावा. विधान परिषदेत शिक्षकांचा प्रभावी आवाज निर्माण करण्यासाठी यावेळी परिवर्तन घडवायचे आहे, असे बेलसरे म्हणाले.

अमरावती शिक्षक मतदारसंघ हा शिक्षक संघटनेचा मतदारसंघ असून तो कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रभावाखाली जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. शिक्षकांनी संघटनेवर ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

‘शिक्षकांचे प्रश्न शिक्षकच प्रभावीपणे मांडू शकतात’

उमेदवार सुरेश देवकर यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याची चिंता व्यक्त केली. शिक्षकांच्या अडचणी आणि त्यांच्या प्रश्नांची खरी जाणीव शिक्षक संघटनांनाच आहे. त्यामुळे शिक्षकांच्या हक्कांसाठीच शिक्षक भारतीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कोणत्याही प्रकारे गाफील राहू नका. प्रत्येकाने आपापल्या भागात सक्रिय राहून मतदानासाठी शिक्षकांशी संपर्क साधावा. शाळा आणि शिक्षकांचे अस्तित्व टिकवण्यासाठी ही लढाई महत्त्वाची आहे. प्रत्येक मत निर्णायक असून शिक्षकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन देवकर यांनी केले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!