खळबळजनक ! धांडे लेआउटमध्ये मध्यरात्री दरोडा
हातात कोयते घेऊन फिरणारे सहा युवक सीसीटीव्हीत कैद; जिल्हा परिषद शिक्षकाच्या घराला लक्ष्य

बुलडाणा
शहरातील धांडे लेआउट परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास दरोड्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद शिक्षक तुषार कुसुंबे यांच्या घरात पहाटे ३ ते ४ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून अंदाजे अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आले. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास हातात कोयते घेऊन सहा युवक परिसरात फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना गुरुवार ८ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील धांडे लेआउट परिसरातील अगदी गजबजलेल्या ठिकाणी तुषार कुसुंबे नामक शिक्षक राहतात. त्यांचे नुकतेच लग्न झाले आहे. घरातील समोरच्या दोन खोल्यात त्यांचे बस्तान आहे. बुधवारी रात्री काही अडचणी मुळे दोघे पती पत्नी समोरच्या खोलीत मुक्काम न करता पाठीमागे असलेल्या खोल्यात मुक्काम केला. दरम्यान मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात सहा व्यक्तींनी तुषार कुसुंबे यांच्या घराला लक्ष्य केले. घराला समोरुन कुलूप पाहून दरोडेखोरांनी कुलूप लावण्याचा कोंडा कटर ने तोडून घरात प्रवेश केला. यावेळी खोल्यातील सर्व साहित्य विस्कटून टाकले. अलमारी तोडून त्यातील साहित्य ही अस्तव्यस्त करत तोडफोड केली. दरोडेखोरांनी कपाटातील सुमारे अडीच लाखाचे ऐवज चोरुन नेला. दरम्यान, हातात कोयते घेऊन फिरणाऱ्या सहा युवकांचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने या घटने मुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
या प्रकरणी तुषार कुसुुंबे यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसात अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस तपासाकडे लक्ष
घटनेतील चोरीस गेलेल्या ऐवजाचा नेमका तपशील, घरात प्रवेश कसा करण्यात आला आणि सीसीटीव्हीत दिसणाऱ्या युवकांचा या घटनेशी काही संबंध आहे का, याबाबत अधिक माहिती समोर येणे बाकी आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेऊन परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




