अर्धा तास धगधगत राहिली वीज वितरण पेटी

दोन  महिन्यांत दुसऱ्यांदा डीपी जळाल्याने नागरिकांमध्ये चिंता

 

धामणगाव बढे एस. बि. शेख

धामणगाव बढे येथील ब्रिज कॉलनी, वार्ड क्रमांक ४ मधील मुख्य रोडाला लागून वीज वितरण पेटीला (डीपी) आज सकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. बसस्थानक परिसरातील दोन विद्युत खांबांवर जोरदार शॉर्टसर्किट झाल्याने डीपीने पेट घेतला. या आगीत डीपी पूर्णपणे जळून खाक झाली. सुमारे अर्धा तास ही डीपी धगधगत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेमुळे ब्रिज कॉलनीसह संबंधित परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. डीपीला आग लागण्याची ही गेल्या दोन महिन्यांतील दुसरी घटना असल्याने महावितरणच्या विद्युत यंत्रणेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वारंवारच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त

धामणगाव बढे गावात वारंवार डीपीचे फ्यूज उडणे, डीपी जळणे तसेच विद्युत पुरवठ्यात बिघाड होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे विद्युत उपकरणांचे नुकसान होण्याची भीतीही नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

ब्रिज कॉलनीतील डीपी दोन महिन्यांत दुसऱ्यांदा जळाल्याने संबंधित डीपीची तपासणी करून आवश्यकतेनुसार नवीन डीपी बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच गावातील इतर डीपींचीही तपासणी करून धोकादायक विद्युत यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

महावितरणने कायमस्वरूपी उपाययोजना करावी

धामणगाव बढे गावातील वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता विद्युत यंत्रणेची सखोल तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन डीपी बसवाव्यात. तसेच वारंवार शॉर्टसर्किट होण्याची कारणे शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी धामणगाव बढे येथील नागरिकांकडून होत आहे.

वारंवार डीपी जळण्याच्या घटनांमुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच महावितरणने जागे होऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!