२६ व्या विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बुलडाण्याचा डंका
संदीप तायडे याने पटकाविला तृतीय क्रमांक

प्रतिनिधी | बुलडाणा :
बुलडाणा शहरातील रामनगर परिसरातील रहिवासी संदीप तायडे या युवकाने विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत यश संपादन करत बुलडाणा जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घातली आहे. शेगाव येथे पार पडलेल्या २६ व्या विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत संदीपने दमदार कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा १ फेब्रुवारी रोजी पार पडली.
सदर स्पर्धेचे आयोजन इंडियन बॉडीबिल्डिंग अॅण्ड फिटनेस फेडरेशनच्या मान्यतेने, बुलडाणा बॉडीबिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशन व विदर्भ बॉडीबिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच छत्रपती तालिम ग्रुप, तेलीपुरा यांच्या सौजन्याने करण्यात आले होते. ही स्पर्धा शेगाव येथील स्व. गजाननदादा पाटील कॉटन मार्केट यार्ड येथे सायंकाळी ५ वाजता उत्साहात पार पडली. ग्रामीण व निमशहरी भागातील होतकरू खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ७५ ते ८० किलो वजन गटात झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत संदीप तायडेने उत्कृष्ट सादरीकरण करत परीक्षकांची दाद मिळवली आणि तृतीय क्रमांकावर आपले नाव कोरले.
स्पर्धेनंतर आयोजक निखिल बावस्कर, आकाश राठोड यांच्या हस्ते संदीपला मानपत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आला. संदीप हा मागील अनेक वर्षांपासून शहरातील नामांकित चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथे कर्मचारी म्हणून कार्यरत असून, डीपीएस जिम येथे अर्धवेळ प्रशिक्षक म्हणूनही तो सेवा देत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल दीपक नागरे, प्रमोद सरदेसाई, सोनू चव्हाण, सतीश जाधव, मोहन दामले, रुद्रा तायडे, सोनू चिखले आदी मित्रपरिवार व हितचिंतकांनी संदीप तायडे याचे मनापासून अभिनंदन केले आहे.




