भगवान विश्वकर्मा यांच्या विचारांचा वारसा जपणे समाजाची जबाबदारी – ह.भ.प. शिवराज महाराज पवार

प्रतिनिधी | बुलडाणा
शिल्पकला, कौशल्य व परिश्रमाचे प्रतीक असलेल्या भगवान विश्वकर्मा यांच्या विचारांचा वारसा जपणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून, या विचारांमधूनच पुढील पिढीला दिशा मिळते, असे प्रतिपादन ह.भ.प. शिवराज महाराज पवार (अंभोडा) यांनी केले.
ते, अखिल लोहार गाडी लोहार समाज विकास संस्था, महाराष्ट्र राज्य शाखा बुलडाणा व बुलडाणा जिल्हा विश्वकर्मा बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भगवान विश्वकर्मा जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम ३१ जानेवारी रोजी वारकरी भवन, बुलडाणा येथे भक्तिभावात व उत्साहात पार पडला. या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिकेच्या अध्यक्षा पुजा गायकवाड होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरपालिकेचे उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, शिवसेना नेते विजय अंभोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, बांधकाम सभापती पुष्पा धूड, शिक्षण सभापती दिपक सोनोने, प्रकाशराव सुरडकर, दामोदर बिडवे, संदीप पाटील, अजयसिंग राजपूत, सुभाष कव्हळे, गजानन वाघ, जिजाबाई राठोड, सरलाताई तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्य वक्ते ह.भ.प. शिवराज महाराज पवार यांनी भगवान विश्वकर्मा यांनी विश्वनिर्मितीत बजावलेली भूमिका, शिल्पकलेतील कौशल्य, सर्जनशीलता व परिश्रमाचे महत्त्व सखोल व प्रेरणादायी शब्दांत मांडले. विश्वकर्मा यांच्या विचारांचा अंगीकार केल्यास समाज प्रगतीपथावर जाईल, असे त्यांनी सांगितले.
यानंतर दामोदर बिडवे यांनी समाज संघटन, परंपरेचे जतन व सामाजिक बांधिलकीवर भर देणारे मनोगत व्यक्त केले. सौ. जिजाबाई राठोड यांनी महिला व युवकांनी शिक्षण, कौशल्य विकास व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
प्रास्ताविकात प्रकाशराव सुरडकर यांनी जयंती उत्सव आयोजना मागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे संचालन मंजितसिंग राजपूत यांनी तर आभार प्रदर्शन धनंजय चाफेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी लोहार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास व संघटन आवश्यक – आ. संजय गायकवाड
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि संघटन या तीन घटकांवर भर देणे काळाची गरज असून, याच माध्यमातून समाज सक्षम व स्वावलंबी बनू शकतो. भगवान विश्वकर्मा हे कौशल्य, परिश्रम आणि सर्जनशीलतेचे प्रतीक असून त्यांच्या विचारांचा अंगीकार केल्यास समाज प्रगतीच्या दिशेने निश्चितच वाटचाल करेल. युवकांनी शिक्षणासोबतच आधुनिक कौशल्य आत्मसात करून संघटितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

भक्तीमय भजनांनी भारले वारकरी भवन
भगवान विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त वारकरी भवन, बुलडाणा येथे आयोजित कार्यक्रमात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. गजानन महाराज महिला भजनी मंडळ, हतेडी बु. तसेच मुक्ताबाई संप्रदायिक महिला भजनी मंडळ, साखळी बु. यांच्या सुमधुर अभंग व भजनांनी संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. पारंपरिक वारी परंपरेतील अभंग, भजन व नामस्मरणामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. भजनांच्या माध्यमातून भगवान विश्वकर्मा यांच्या कार्याचा, श्रमसंस्कृतीचा व भक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. ताल, टाळ, मृदंगाच्या गजरात सादर झालेल्या भजनांनी कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची प्राप्त करून दिली. यावेळी उपस्थित समाजबांधव, महिला व युवकांनी टाळ्यांच्या गजरात भजनांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या भक्तीमय सादरीकरणामुळे संपूर्ण वारकरी भवनात श्रद्धा, भक्ती व सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले.

स्व. अजित पवार यांना वाहण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली
भगवान विश्वकर्मा जयंती उत्सव कार्यक्रमाच्या शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व समाजबांधवांच्या वतीने दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजलीच्या क्षणी सभागृहात शांतता पसरली असून उपस्थितांनी त्यांच्या कार्याची आठवण काढत आदरांजली वाहिली.
00

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!