एसटी बसमध्येच सोन्याचे दागिने लंपास!
प्रतिनिधी | देऊळगाव राजा
घरफोडीप्रमाणेच आता राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्येही चोऱ्यांचे प्रकार वाढू लागले असून, प्रवाशांच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत चोरट्यांनी थेट बसप्रवासातच हात साफ केल्याची घटना समोर आली आहे. देऊळगाव राजा ते देऊळगाव मही या एसटी बस प्रवासादरम्यान एका महिलेकडील तब्बल दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार, येथील संजय नगर भागातील रहिवासी फैमीना बी. सत्तार नुरमोहम्मद वय ५५,या देऊळगाव राजा येथून देऊळगाव महीकडे एसटी बसने प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान दोन अनोळखी महिला त्यांच्या शेजारी येवून बसल्या. या महिला देखील देऊळगाव मही येथे जात असल्याचे त्यांनी सांगितले. काही वेळांनी दोन पैकी एका महिलेने त्यांना बोलण्यात गुंतवले व दुसऱ्या महिलेने त्यांच्या जवळील पर्समधील सोन्याचे दागिने लंपास केले. सदर महिला देऊळगाव मही येण्याआधीच घाई गरबडीने गाडीतून उतरल्या. त्यामुळे फैमीना बी यांना शंका आली. यावेळी त्यांनी आपल्या पर्स मधील दागीने तपासले असता त्यांना ते चोरीला गेल्याचे आढळून आले. यामध्ये सोन्याचे गोल मणी असलेली पोत (१९० मणी, अंदाजे ३ तोळे, किंमत सुमारे ७५ हजार रुपये) तसेच गोल डब्याची पुतळी (१७ नग, अंदाजे ५ तोळे, किंमत सुमारे १ लाख २५ हजार रुपये) असा एकूण सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
या प्रकरणी फैमीना बी. सत्तार नुरमोहम्मद यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिंड करीत आहेत.
बसप्रवासात प्रवाशांचे दुर्लक्ष ठरते महागात
एसटी बसस्थानक व बसप्रवासादरम्यान वारंवार सूचना देऊनही अनेक प्रवासी दागिने व रोख रक्कम सुरक्षित न ठेवता निष्काळजीपणा दाखवित असल्याचे चित्र आहे. गर्दीचा फायदा घेत चोरटे महिलांना लक्ष्य करीत असून, अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पोलिसांनी प्रवाशांना बसप्रवासात पर्स, दागिने व मौल्यवान वस्तूंबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.



