सुनगावात श्री आवजीसिद्ध महाराजांच्या यात्रेत भक्तांची मांदियाळी

प्रतिनिधी | जळगाव जामोद
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या सुनगाव येथे जागृत ग्रामदैवत श्री आवजीसिद्ध महाराज यांच्या भंडारा उत्सवानिमित्त भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. या उत्सवाच्या अनुशंगाने गावात ७ फेब्रुवारी रोजी भंडारा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी माघ कृष्ण षष्ठीला श्री आवजीसिद्ध महाराजांचा भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो. सुनगावकरांसाठी हा भंडारा म्हणजे दिवाळी व दसऱ्यापेक्षाही अधिक आनंदाचा सण मानला जातो. त्यामुळे गावासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल होतात. श्री आवजीसिद्ध महाराजांचा जन्म रावेर (जि. जळगाव) येथे झाला. बालपणापासून दृष्टीहीन असलेले महाराज सुनगाव येथे आपल्या मावशी अंबाबाईकडे वास्तव्यास आले. याच काळात ढवळ्यागिरी येथील यात्रेस जाणाऱ्या शिवभक्तांविषयी माहिती मिळाल्यानंतर महाराजांनीही भक्तीभावाने त्या यात्रेला जाण्याचा संकल्प केला. भोळ्या शंकराच्या कृपेने दृष्टी प्राप्त झाल्यास उंच कड्यावरून उडी घेण्याचा संकल्प त्यांनी केला होता. कथेनुसार, दृष्टी प्राप्त झाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी अंतर्धान पावले आणि त्यांनी मावशी अंबाबाईकडे दिलेल्या सुपारीतून बाण फुटले. तेच बाण पुढे सुनगावचे ग्रामदैवत श्री आवजीसिद्ध महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले, अशी आख्यायिका प्रचलित आहे.
आजही आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भाविक दर शुक्रवारी महाराजांना बेल अर्पण करतात. बेल मांडण्याच्या विशिष्ट श्रद्धापद्धतीतून मनोकामना पूर्ण होतात, असा भाविकांचा ठाम विश्वास आहे.
भंडाऱ्याची काढण्यात येते मिरवणूक
भंडाऱ्याच्या दिवशी गावातून ढोल-ताशांच्या गजरात भंडाऱ्याची मिरवणूक काढण्यात येते. उडदाची डाळ, ज्वारीचा आटा व अन्य साहित्य गाड्यांद्वारे गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील मंदिरात नेण्यात येते. तेथे गावकरी एकत्र येऊन उडदाची डाळ व महिलांकडून भाकऱ्या तयार करून महाप्रसाद बनवला जातो. या महाप्रसादासाठी व दर्शनासाठी गावातील सर्व समाजातील विवाहित मुली व महिला आवर्जून उपस्थित राहतात. दिवाळीत येऊ न शकलेल्या विवाहित मुली खास भंडाऱ्याच्या दिवशी माहेरी येतात, ही येथील परंपरा आहे.
७ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे होणार वितरण
भंडाऱ्याच्या निमित्ताने सुनगावमध्ये भक्तीमय व उत्सवी वातावरण आहे. श्री आवजीसिद्ध महाराजांची कीर्ती दिवसेंदिवस वाढत असून संस्थानचे कार्यही प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे या संस्थानास तीर्थक्षेत्र ‘ब’ दर्जा प्राप्त झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच माघ शष्ठीच्या दिवशी ७ फेब्रुवारी रोजी उडदाची डाळ व ज्वारीच्या भाकरीचा प्रसाद या ठिकाणी भाविकांना वितरित केला जाणार आहे.




