लिबियावर ४२ वर्षे राज्य करणाऱ्या हुकूमशहाच्या मुलाची हत्या

झिंतान :
लिबियावर ४२ वर्षे राज्य करणाऱ्या हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीचा मुलगा सैफ अल-इस्लाम गद्दाफीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राजधानी त्रिपोलीपासून १३६ किलोमीटर नैर्ऋत्येला असलेल्या झिंतान शहरात ही घटना घडली. ही हत्या कोणी केली हे अद्याप समजलेले नाही.
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान आणि लिबियातील सध्याचे सरकार यांच्यात एक करार झाला होता. या कराराला आक्षेप घेणाऱ्या सैफ अल-इस्लाम गद्दाफीची हत्या झाल्यामुळे यामागे पाकिस्तानचा किंवा पाकिस्तानला मदत करणाऱ्यांपैकी एखाद्या व्यक्ती अथवा संस्थेचा हात असल्याची चर्चा आहे. पण लिबिया सरकारने या प्रकरणी तपास सुरू आहे असे मोघम उत्तर दिले आहे. सैफ अल-इस्लाम गद्दाफीच्या हत्येमुळे लिबियात पुन्हा हिंसेचे थैमान सुरू होण्याची भीती काही जण व्यक्त करत आहेत.
कोण होता अल-इस्लाम गद्दाफी ?
त्रिपोलीत २५ जून १९७२ रोजी जन्मलेला सैफ अल-इस्लाम गद्दाफी हा लिबियावर ४२ वर्षे राज्य करणाऱ्या हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीचा मुलगा. सफिया फरकाश ही त्याची आई. सफियाचा हा दुसरा मुलगा. वडिलांच्या काळात लहान वयातच सैफ अल-इस्लाम गद्दाफी याचे देशातले महत्त्व वाढले होते. मुअम्मर गद्दाफीचा वारसदार म्हणून त्याच्याकडे अनेकजण बघत होते. पुढे लिबिया आणि पाश्चात्य देश यांच्यातील अधिकृत दुवा म्हणून सैफ अल-इस्लाम गद्दाफी काम करत होता. अनेक आंतरराष्ट्रीय निर्बंधांमधून देशाला बाहेर काढण्यासाठी सैफ अल-इस्लाम गद्दाफीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि युरोपमधील शिक्षणामुळे यामुळे त्याला अनेकजण लिबियाचा आधुनिका चेहरा म्हणू लागले होते. त्याने १९९४ मध्ये त्रिपोलीच्या अल-फातेह विद्यापीठातून अभियांत्रिकी विज्ञानातील पदवी घेतली होती. त्यानंतर ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथील इमाडेक बिझनेस स्कूलमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याला २००८ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने पीएच.डी. प्रदान केली होती. विशेष म्हणजे २००५ मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने त्याची ‘यंग ग्लोबल लीडर’ म्हणून निवड केली होती. तसेच डब्ल्यूईएफचे संस्थापक क्लॉस श्वाब यांनी जानेवारी २०११ मधील दावोस परिषदेसाठी त्याला वैयक्तिकरीत्या आमंत्रित केले होते.




