NCP कोअर कमिटीची सोमवारी बैठक

मुंबई,
राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा अजित पवार यांनी कार्यालयातील लिपिकाच्या लाचखोरीमुळे अडचणीत सापडलेल्या मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या पाठिशी उभे राहण्याचे संकेत दिलेत. या प्रकरणी चर्चा करण्यासाठी त्यांनी सोमवारी सायंकाळी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. ही बैठक सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला एसीबीने 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. विरोधकांनी या प्रकरणी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामु्ळे ते संकटात सापडलेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर झिरवाळ यांनी आपला या प्रकरणाशी संबंध आढळला तर आपण राजीनामा देऊ असे स्पष्ट केले आहे. पण शनिवारी सकाळपासूनच ते नॉट रिचेबल झाल्यामुळे त्यांच्यावर असलेला दबाव स्पष्ट झाला आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे संकेत दिलेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवारांनी सोमवारी सायंकाळी 6 वा. पक्षाच्या कोअर कमिटीची तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत नरहरी झिरवाळ प्रकरणात नेमके काय झाले? व पुढे काय करता येईल? या प्रश्नांवर सदस्यांची मते जाणून घेणार आहेत. प्रस्तुत बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीवरही चर्चा होणार आहे. पुढील 15 दिवसांत यासंबंधीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे असा अंदाज आहे.



