नाणेफेक झाली, पण हस्तांदोलन नाही! टीम इंडियाची ‘नो हँडशेक’ पॉलिसी कायम

कोलंबो,
विश्वचषक २०२६ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याला कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. मात्र, खेळाला सुरुवात होण्यापूर्वीच मैदानावर तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. नाणेफेकीच्या वेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हस्तांदोलन न करता ‘नो हँडशेक’ धोरण कायम ठेवले आहे.
नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार जेव्हा मैदानात आले, तेव्हा सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधाराकडे साधे पाहिले देखील नाही. टॉस झाल्यानंतर दोन्ही कर्णधारांनी प्रेझेंटरशी संवाद साधला आणि हस्तांदोलन न करताच आपापल्या डगआऊटच्या दिशेने निघून गेले. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५ आशिया चषक: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे क्रीडा संबंध अधिक ताणले गेले आहेत. २०२५ च्या आशिया चषकातील तीनही सामन्यांत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळवणे टाळले होते. केवळ वरिष्ठ संघच नाही, तर भारताच्या ज्युनियर संघांनीही या धोरणाचे पालन केले आहे. आजच्या विश्वचषकातील सर्वात मोठ्या सामन्यातही सूर्याने हाच कित्ता गिरवला. सामन्यापूर्वी सलमान अली आघाने पत्रकार परिषदेत “क्रिकेट नेहमी खेळ भावनेने खेळले जावे,” असे विधान केले होते. मात्र, सूर्यकुमार यादवने यावर कोणतेही थेट उत्तर न देता “मैदानावरच काय ते पाहा,” असे सांगितले होते. आज प्रत्यक्षात कृतीतून सूर्याने भारताची आक्रमक आणि स्पष्ट भूमिका जगासमोर मांडली आहे.




