राष्ट्रवादीला पोकळ करण्याचा भाजपचा प्रयत्न; बच्चू कडूंचा खळबळजनक आरोप

अमरावती,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच पाच ते सहा जण असे आहेत, जे प्रत्यक्षात भाजपचेच काम करत आहेत. हे लोक थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याऐवजी राष्ट्रवादीत राहून पक्षाला आतून पोकळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप माजी आ. बच्चु कडू यांनी केला.
ते, १६ फेब्रुवारी रोजी अमरावती येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कडू यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादीत राहून भाजपची बाजू घेणारे काही नेते पक्षाला कमजोर करत असून, राष्ट्रवादीला कमी करण्याची ही भाजपची खेळी असल्याचा आरोप कडू यांनी केला. शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही, यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास महाराष्ट्रात रेल्वे चालू देणार नाही, असा इशारा देत त्यांनी आगामी काळात गनिमी काव्याने आंदोलन छेडण्याचे संकेत दिले.
शेतकरी प्रश्नावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना कडू यांनी आरोग्य विभागातील निर्णयांवरही प्रश्न उपस्थित केले. पूर्वी सिव्हिल सर्जनकडे असलेले औषध खरेदीचे अधिकार आता मंत्रालयाने स्वतःकडे घेतल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. कमिशनसाठी औषधांचे दर वाढवले जात आहेत, असेही ते म्हणाले. ना खाऊंगा, ना खाने दूंगा, म्हणणारेच आज टेंडर प्रक्रियेतून सर्वाधिक भ्रष्टाचार करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे
दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरूनही त्यांनी संताप व्यक्त केला. ज्या दिव्यांगांना दोन पाय नाहीत, त्यांचे पगार वेळेवर न देणाऱ्यांच्या कानफटात मारण्याची वेळ आली आहे, असे तीव्र शब्दांत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. बच्चू कडू यांच्या या सलग आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद, भाजपवर केलेले गंभीर आरोप, शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून त्यांनी उभा केलेला संघर्ष पुढील काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.



