समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक, २७ प्रवासी जखमी

मेहकर,
समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने २७ प्रवासी जखमी झाले. यामध्ये अनेक प्रवाशांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून त्यांच्यावर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
माहितीनुसार, पुणे येथून नागपूरकडे निघालेली एमएच-३१ एफसी-७४६८ क्रमांकाची खासगी ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अपघातग्रस्त झाली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स समोरून जाणाऱ्या ट्रकवर आदळली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर संबंधित ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस व मेहकर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने जखमी प्रवाशांना बाहेर काढून रुग्णवाहिकांच्या मदतीने मेहकर ग्रामीण रुग्णालयात हलविले. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संतोष मलोसे यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला.
ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या पथकाने जखमींवर तातडीने उपचार सुरू केले. प्राथमिक उपचारानंतर काही जखमींना त्यांच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले.
अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. सकाळपर्यंत पंचनामा व इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून मेहकर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
तत्पर मदतीमुळे मोठी जीवितहानी टळली
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक आणि रुग्णवाहिका सेवा अल्पावधीत घटनास्थळी पोहोचली. जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळाल्याने संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात सक्रिय सहभाग नोंदविला.
प्रवाशांमध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश
जखमी झालेल्या २७ प्रवाशांमध्ये महिला, पुरुष तसेच काही लहान मुलांचा समावेश आहे. नागपूर, पुणे, बुलढाणा, चंद्रपूर, बीड, खापरखेडा आणि अहिल्यानगर येथील प्रवासी या ट्रॅव्हल्समधून प्रवास करीत होते. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, बहुतेक प्रवाशांना डोक्याला, हातापायांना व शरीराच्या विविध भागांना दुखापती झाल्या आहेत.



