खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलढाण्यात दाखल; आमदार   गायकवाड यांची प्रत्यक्ष पाहणी

बुलढाणा,

 शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणातील जलसाठा मृतसाठ्याच्या पातळीवर पोहोचल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अखेर खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलढाणा शहरासाठी उपलब्ध झाले आहे. विविध तांत्रिक अडचणींवर मात करत प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या प्रयत्नांमुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या बुलढाणा शहराला येळगाव धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, धरणातील जलसाठा अत्यल्प झाल्याने पुरवठा होणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणात गाळ मिसळत होता. या पाण्यावर अॅलम, ब्लीचिंग पावडर, क्लोरीन गॅस, पीएसी पावडर यांसारख्या रासायनिक प्रक्रियेद्वारे शुद्धीकरण करून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात होता.  धरणातील घटता जलसाठा लक्षात घेऊन मागील महिनाभरापासून खडकपूर्णा प्रकल्पावरून बुलढाणा शहरासाठी पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू होते. आमदार  संजुभाऊ गायकवाड आणि नगराध्यक्षा पूजाताई संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.  खडकपूर्णा प्रकल्पावरून पाणी उचलण्यासाठी बसविण्यात आलेल्या ६५० अश्वशक्ती क्षमतेच्या तीन मोटारपंपांच्या हायटेन्शन पॅनलमध्ये उंदरांनी विद्युत तारा कुरतडल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही बाब निदर्शनास येताच आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी संबंधित कंपनीशी संपर्क साधून पुणे येथील तांत्रिक पथकाला पाचारण केले. अकोला येथील महावीर इलेक्ट्रिकल्स आणि चिखली येथील ढवळे इलेक्ट्रिकल्स यांच्या सहकार्याने पॅनलची दुरुस्ती युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली.

याचबरोबर खडकपूर्णा-चिखली आणि चिखली-बुलढाणा या सुमारे ६० किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनवरील विविध गळतीही नगरपालिकेच्या पथकाने तंत्रज्ञांच्या मदतीने दुरुस्त केल्या. सर्व तांत्रिक अडथळे दूर झाल्यानंतर रविवारी सकाळपासून खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलढाणा शहरासाठी सुरू करण्यात आले.

खडकपूर्णाचे पाणी येळगाव जलशुद्धीकरण केंद्रावर पोहोचल्यानंतर आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामांची पाहणी केली व अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी नागरिकांना आवाहन करताना त्यांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले. सुमारे ६० किलोमीटर अंतरावरून पाणी आणले जात असल्याने काही तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मुख्याधिकारी गणेश पांडे, उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, पाणीपुरवठा सभापती नयनप्रकाश शर्मा, नगरसेवक युनुस खान, प्रशांत जाधव, बबलू मावतवाल, योगेश परसे, निसार खान, रामेश्वर वावरे, अतुल लाहोटी, पाणीपुरवठा अभियंता राजेश गायकवाड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि तांत्रिक पथक उपस्थित होते.

उंदरांमुळे पाणीपुरवठा रखडला

खडकपूर्णा प्रकल्पावरील हायटेन्शन पॅनलमधील विद्युत तारा उंदरांनी कुरतडल्यामुळे पंपिंग यंत्रणा सुरू होण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू करण्यात विलंब झाला. मात्र तांत्रिक पथकाने तातडीने दुरुस्ती करून यंत्रणा कार्यान्वित केली आणि पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला.

पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी सुमारे ६० किलोमीटर अंतरावरून बुलढाण्यात आणले जात आहे. या लांब पल्ल्याच्या पुरवठ्यात तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, गळती रोखावी आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी केले आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!