ब्रिटनमध्ये १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर लवकरच बंदी

वृत्तसंस्था
लहान मुलांवरील सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त होत असताना ब्रिटन सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर निर्बंध किंवा बंदी घालण्याचा प्रस्ताव चर्चेत असून, त्यासंदर्भातील नियम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेतला जात असल्याचे सांगितले जात आहे.
या अंतर्गत, मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट्सवर 16 वर्षांखालील मुलांची पोहोच मर्यादित केली जाऊ शकते. तथापि, व्हॉट्सॲपसारख्या मेसेजिंग सेवा आणि यूट्यूब किड्ससारख्या शैक्षणिक प्लॅटफॉर्मना सूट मिळू शकते. सोशल मीडिया बंदीबाबत जागतिक स्तरावरही चर्चा तीव्र आहे. ऑस्ट्रेलियाने आधीच अशा प्रकारचा कायदा लागू केला आहे, तर कॅनडा आणि युरोपीय संघ देखील याच दिशेने पुढे वाटचाल करत आहेत. मार्चमध्ये यूगॉव्हच्या सर्वेक्षणानुसार ७६% ब्रिटिश नागरिकांनी अशा बंदीचे समर्थन केले होते, जे प्रमुख युरोपीय देशांमध्ये सर्वाधिक समर्थन मानले गेले. लेबर नेते अँडी बर्नहॅम यांचे म्हणणे आहे की, सोशल मीडिया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मोठ्या टेक कंपन्यांना नियंत्रित करण्याची वेळ आली आहे.




