जिल्हयातील ३३ गावे मुख्य मार्गाला जोडण्यास मिळाली हिरवी झेंडी
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुरावा मिळाले यश

बुलडाणा
ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने बुलडाणा जिल्ह्यातील ३३ ग्रामीण रस्त्यांच्या दर्जोन्नतीला ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली आहे. सुमारे ९५ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याला नुकतेच मंजूरी देण्यात आली आहे. या मंजुरीबद्दल केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मंगळवार २५ ऑगस्ट रोजी मुंबई येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.
ग्रामीण भागातील रस्ते हे गावांना मुख्य मार्ग, बाजारपेठा, औद्योगिक क्षेत्रे आणि शहरांशी जोडणारे महत्त्वाचे माध्यम आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या दर्जोन्नतीमुळे संबंधित गावांमधील नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होण्यासोबतच शेतीमालाच्या वाहतुकीलाही फायदा होतो. मागील अनेक महिन्यापासून जिल्हयातील अनेक गावातील शेतकरी खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे सदर अडचण सोडवण्यासाठी मागणी क रत होते. विषयाचे गांभीर्य पाहता खा. जाधव यांनी या बाबत ग्रामविकास मंत्री गोरे यांच्याकडे मागणी केली होती. सातत्याने पाठपुरावा व विषयाचे महत्व पाहता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या बाबत नुकतेच हिरवी झेंडी देत सदर विषयास मंजूरी दिली आहे.
मंजूर झालेल्या कामांमध्ये लोणार तालुक्यातील आरडव ते मुख्य रस्ता ते अढाव मुख्य रस्ता, हत्ता ते पिंप्री खंडारे, सिंदखेड राजा तालुक्यातील चांगेफळ ते बोराखेडी गंडे, चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज ते खैरव फाटा, तसेच खंडाळा मकरध्वज ते गोद्री एमआयडीसी जोडरस्ता यांचा समावेश आहे. यात बुलडाणा तालुक्यातील घाटनांद्रा ते उबरखेड, अंभोडा ते तांदुळवाडी, चिखला ते झरी, धाड ते मोहोज, अंत्री तेली ते केळवद शिवार आणि साखळी खुर्द ते तांदुळवाडी या रस्त्यांनाही मंजुरी मिळाली आहे. या भागातील एकूण ३६.५० किलोमीटरच्या रस्त्यांच्या दर्जोन्नतीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यातील मादणी ते पिंपरपाधी, मादणी ते लेहणी, मादणी टी-पॉईंट ते मौंढाळा, मादणी ते वडजी, लेहणी शिव ते बेलजाई महादेव मंदिर, कल्याणा ते नेमतापूर, अंत्री देशमुख ते तुरखेड, अंत्री देशमुख ते बोरखेडी, वर्दडी वैराळ ते महोदरी, वर्दडी वैराळ ते आनंदवन महादेव खोरी, नांद्रा नजीक चायगाव ते कळपविहीर आणि नांद्रा चायगाव ते सायाळा या रस्त्यांचा समावेश आहे. याशिवाय पेनटाकळी ते कासारखेड, पेनटाकळी ते कळंबेश्वर धरण, उसरण ते नागझरी, बाभुळखेड ते उसरण फाटा, थार ते धानोरी, डोणगाव ते लांडेवाडी, डोणगाव ते आंध्रुड, डोणगाव ते नागापूर, तसेच नांदुरा तालुक्यातील खंडाळा फाटा ते खडदगाव, पिंपळखुटा धांडे ते लोणवाडी आणि तरवाडी ते मेंढळी या रस्त्यांनाही दर्जोन्नतीची मंजुरी देण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांनी मुंबई दौऱ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेत बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांवर चर्चा करत सदर विषया बाबत आभार ही मानले.
00




