पावसाअभावी सुकत चाललेल्या पिकांची प्रतापराव जाधवांकडून बांधावर जाऊन पाहणी

नुकसानीचे पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश; ‘खचून जाऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

बुलडाणा

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पिकांवर संकट ओढवले आहे. पिके सुकण्यास सुरुवात झाल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाअभावी झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
यंदा जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पावसाळ्याला सुरुवात झाली. पेरणीनंतर सुरुवातीला पिकांची वाढ चांगली झाली होती. मात्र, मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने मोठी उघडीप दिल्याने अनेक भागांतील पिके पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. विशेषतः सोयाबीन पीक फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत असताना पावसाचा खंड पडल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात यंदा सुमारे ३ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. सध्या पावसाअभावी सुमारे ४० टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, उत्पादनातही जवळपास ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा, अटाळी, शाहापूर, आडगाव, बोरी, शिर्ला आणि नेमाने परिसरातील शेतांमध्ये जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. ‘पाऊस पडणे ही निसर्गाच्या हातातील बाब आहे. मात्र, या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे,’ असा धीर त्यांनी दिला. तसेच पाण्याअभावी पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष नोंदवून त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्यांना दिल्या.
पाहणीदरम्यान जिल्हा कृषी अधिकारी संतोष डाबरे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष डिवरे, अमोल अंधारे, तालुकाप्रमुख राजू बघे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!