सुलतानपूरमध्ये पहाटे काळाचा घाला; दोन दुकाने आगीत भस्मसात, ८७ लाखांवर पाणी 

बेरोजगार युवकांनी स्वप्नातून उभारलेला संसार आगीत जळून खाक; कर्ज फेडायचं कसं या चिंतेने कुटुंब हवालदिल

सुलतानपूर,

 दुष्काळात आधीच जगणं कठीण झालं असताना सुलतानपूरच्या दोन कष्टकरी कुटुंबावर आज पहाटे काळाने घाला घातला. जालना रोडवर असलेली दोन दुकाने क्षणार्धात आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि लाखो रुपयांचा संसार जळून राख झाला.

शनिवारी पहाटे साडेपाच वाजेची वेळ. गाव अजून झोपेतच होते. याचवेळी शेजाऱ्यांना दुकानातून धूर निघताना दिसला. आरडाओरडा करत त्यांनी दुकानदारांना फोन लावला, पण तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केलं होतं.

अंबादास बळीराम जुमडे यांच्या जागेत असलेली ही दोन दुकाने. एका दुकानात त्यांचं स्वतःचं *तुळजाभवानी साडी सेंटर*होतं आणि दुसरं दुकान त्यांनी सतीश इंगळे यांना भाड्याने दिलं होतं, तिथे *सतीश मशिनरीज हा व्यवसाय सुरू होता.

कमावलेली पुंजी, दुकानात मांडलेला माल, फर्निचर, मशिनरी सगळं काही डोळ्यादेखत जळत होतं आणि हतबल होऊन पाहण्याशिवाय काहीही हातात उरलं नव्हतं.

*८७ लाखाचं नुकसान, कागदपत्रेही राख*

प्राथमिक अंदाजानुसार तुळजाभवानी साडी सेंटरचे सुमारे ४२ लाख आणि सतीश मशिनरीजचे ४५ लाख असे मिळून *८७ लाख रुपयांहून अधिक नुकसान* झालं आहे. दुकानातील लॉकरमध्ये ठेवलेले खरेदी-विक्रीचे दस्तऐवज, शासकीय कागद पत्र , बँकेचे चेक, शाळेची कागदपत्रे, सगळी महत्त्वाची कागदपत्रेही या आगीत जळून खाक झाली आहेत.

*शॉर्टसर्किटचा संशय*

वीज वाहिनीतील शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र नेमकं कारण तपासानंतरच समोर येईल.

*अग्निशमन दल उशिरा, नागरिकांत संताप*

आगीची माहिती दोन अग्निशमन दलांना दिली होती, पण गाड्या वेळेत पोहोचल्या नाहीत आणि एका गाडीच्या पाण्याच्या पंपात बिघाड असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वेळेत पाणी मिळालं असतं तर काहीतरी वाचलं असतं, अशी हळहळ नागरिक व्यक्त करत आहेत.

*प्रशासनाकडून पाहणी*

घटनेची माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश जाधव, ग्रामपंचायत अधिकारी नंदकिशोर तेजनकर आणि महसूल अधिकारी पवन बोडखे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

खरं तर हा केवळ आगीचा अपघात नाही, तर दोन बेरोजगार युवकांनी कर्ज काढून उभ्या केलेल्या स्वप्नांवर पडलेला वरवंटा आहे. दुष्काळाने आधीच कंबरडं मोडलं असताना आता हे नवं संकट. व्यवसायाचं कर्ज फेडायचं कसं, पुन्हा उभं राहायचं कसं, या विवंचनेत दोन्ही कुटुंबं सध्या हवालदिल झाली आहेत.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून मदत मिळावी, अशी मागणी अंबादास जुमडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

फोटो ओळ :- आगीच्या भक्षस्थाणी आलेले दुकान !

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!