भरधाव ट्रकने गायींना चिरडले; अकोला महामार्गावर संतापजनक घटना

प्रतिनिधी | खामगाव
अकोला–खामगाव महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकने तीन गायींना चिरडल्याची हृदयद्रावक घटना ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोन गायींचा जागीच मृत्यू झाला, तर एक गाय गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत महामार्गावर असलेल्या गायींना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की एका गायीचा जागीच मृृत्यु झाला. अपघातानंतर बराच वेळ रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांनी मृत गायी व जखमी गायीला बाजूला करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. दरम्यान, खामगावहून अकोल्याकडे जात असताना घटनेची माहिती मिळताच एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे गौसेवक सुरज यादव, अमोल तायडे, मनोज यादव, विरेंद्र पिल्ले, यश येळवे, दर्शन भगत, अर्पण यादव, शुभम माकोडे, गणेश सोसे, वैभव पवार, अंकुश माकोडे व गोविंद यादव आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन गायींना रस्त्याच्या कडेला नेऊन ठेवले, तसेच जखमी गायीला सुरक्षित ठिकाणी हलविले. यानंतर गौधारक व ओबीसी नेते गणेश चौकसे यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांच्या सहकार्याने जखमी गायीला उपचारासाठी फॉर्महाऊस परिसरात हलविण्यात आले. या दुर्दैवी अपघातात दोन गायींना प्राण गमवावे लागले, तर एका गायीला कंबरेत गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती मनोज यादव यांनी दिली आहे.
या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, भरधाव व निष्काळजी वाहनचालकांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.



