संजय राऊतांचा चक्क ठाकरे बंधूला टोला

मुंबई,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पक्षाच्या हाराकिरीवरून थेट ठाकरे बंधूंचे कान टोचण्याचे धाडस दाखवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत राज व उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते. आत्मविश्वास अनेक प्रकारचा असतो. पैशांचा, सत्तेचा, बळाचा व ज्ञानाचा. पण मूर्खपणाचा आत्मविश्वास सर्वोपरी म्हणजे सर्वोच्च असतो, असे ते विरोधकांचे अधिकारवाणीने कान टोचत म्हणालेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजप व त्याच्या मित्रपक्षांनी विजयाची हॅटट्रिक केली. विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावे असे हे निकाल आहेत. लढण्याची व जिंकण्याची भूक असावी लागते, ती संपली काय? फक्त पैसा हाच निवडणुका जिंकून देतो असे ज्यांना वाटते, त्यांनी या निवडणुकीत जिंकलेल्या `फाटक्या’ लोकांकडे पाहायला हवे!
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदांवर भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. शिवसेनेसह विरोधी पक्षांची पीछेहाट झाली व लातूरवगळता एकही जिल्हा परिषद विरोधी पक्षांना जिंकता आली नाही. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया योग्य आहे. ते म्हणतात, “विरोधकांमध्ये लढण्याची इच्छाशक्ती दिसत नाही.” इच्छाशक्तीचा अभाव हे विरोधी पक्षांच्या पराभवाचे मुख्य कारण आहे, असे फडणवीस म्हणत असले तरी ते संपूर्ण खरे नाही. मुळात विरोधी पक्षाने निवडणुका लढूच नयेत अशी परिस्थिती भाजपने निर्माण केली आहे. निवडणुकीत विरोधकांचे उमेदवार पळवायचे किंवा निवडून आल्यावर त्या लोकप्रतिनिधींना पैशाच्या जोरावर विकत घ्यायचे. त्यामुळे विरोधी पक्षाची पीछेहाट होत आहे व निवडणुका आता लढवायच्या कशाला? या मानसिकतेत सगळेच आले.




