‘राजश्री राठोड’ करणार भारताचे प्रतिनिधित्व
आशियाई पॅरा गेम्ससाठी ‘राजश्री’ची भारतीय संघात निवड

यवतमाळ,
दिग्रससारख्या ग्रामीण भागातील राजश्री राठोड हिने आपल्या कौशल्याने थेट थायलंडमधील बँकॉकमध्ये होणाऱ्या ‘आशियाई पॅरा गेम्स’ आणि ‘२०२६ वर्ल्ड आर्चरी पॅरा’ या जागतिक स्पर्धेत धडक मारली आहे. तिला थायलंडमध्ये तिरंगा फडकवत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची राजश्रीला मोठी संधी मिळाली आहे.
राजश्री ही दिग्रस येथील ‘लक्षवेध धनुर्विद्या क्रीडा अकादमीची’ विद्यार्थिनी आहे. तिने अत्यंत सामान्य परिस्थितीतून आपला प्रवास सुरू केला. सराव करताना येणाऱ्या अडचणी, साहित्याची कमतरता, शारीरिक मर्यादा. अशा अनेक अडथळ्यांवर तिने केवळ ‘सातत्य’ आणि ‘कठोर मेहनत’ या दोन शस्त्रांनी मात केली. राजश्रीच्या या यशात तिचे प्रशिक्षक सुरेंद्र राठोड यांचा वाटा सिंहाचा आहे. त्यांनी प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. “राजश्री’मध्ये केवळ कौशल्यच नाही. कधीही हार न मानण्याची जिद्दी वृत्ती आहे.” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तांत्रिक बारकावे आणि मानसिक बळ यांच्या जोरावर त्यांनी राजश्रीला आंतरराष्ट्रीय स्तरासाठी सज्ज केले. तिने केवळ धनुष्य ओढले नाही. तिने आपल्या स्वप्नांनाही नवी दिशा दिली. ग्रामीण भागातील मुलीने जागतिक नकाशावर नाव कोरणे हे आमच्यासाठी सुवर्णक्षणासारखे आहे. सुरेंद्र राठोड, प्रशिक्षक जिल्ह्यात आनंदाचा ‘उत्सव’ राजश्रीच्या निवडीची बातमी समजताच संपूर्ण दिग्रस शहरासह यवतमाळ जिल्ह्यात आनंदाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र धनुविद्या संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदूरकर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी राजश्रीचे अभिनंदन केले आहे. ती देशासाठी पदक घेऊन येईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. राजश्रीची भारतीय संघात झालेली ही निवड म्हणजे निव्वळ यश आणि जिद्द मानली जात आहे.
जेव्हा राजश्रीच्या निवडीचा अधिकृत मेल आला, तेव्हा तिच्या आई-वडिलांना गदगदून आले. “कधी वाटलं नव्हतं की आमची लेक सातासमुद्रापार देशाचा झेंडा फडकवेल,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दिग्रसच्या ग्रामस्थांनी तर ही निवड म्हणजे गावाचा दिवाळी सणच असल्याचे म्हटले आहे. भविष्यातील आशाआता सर्वांचे लक्ष थायलंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेकडे लागले आहे. राजश्रीने आपल्या कौशल्याने ‘लक्षवेध’ साधला असून, ती भारतीय तिरंदाजीच्या इतिहासात एक नवे सोनेरी पान लिहिण्यासाठी सज्ज झाली आहे.




