भयंकर ! अचानक मुलगा कुत्र्या सारखा भुंकू लागला…
उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्हयातील घटना

प्रतिनिधी | प्रयागराज,
एका १७ वर्षीय युवकास कुत्रा चावल्याच्या चार महिन्यानंतर अचानक तब्येत खालावली. सदर युवक कुत्र्या सारखा बसू लागला, खावू लागला व अचानक कुत्र्या सारखा भुंकू लागल्याने गावात एकच खळबळ उडाली. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील मिर्झापूर जिल्हयातील जोगीपुरवा येथे नुकतेच घडली.
मिळालेल्या माहितीनुसार जोगीपुरवा गावातील रहिवासी भाईलाल यांचा १७ वर्षीय मुलगा करण हा काही महिन्यापूर्वी आपल्या आजोळी उत्तर प्रदेश मधील हरौवा येथे गेला होता. दरम्यान या ठिकाणी त्याला कुत्रा चावला होता. याची माहिती मिळताच कुटुंबातील नागरिकांनी त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी युवकाच्या नातेवाईकांना चार रेबीज ची इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. या ठिकाणी युवकाला पहिले इंजेक्शन दिले, तर दुसरे इंजेक्शन परिसरातील कछुआ नामक प्राथमिक आरोग्य केंद्रात दिले. दोन इंजेक्शन घेतल्यानंतर सदर युवक व त्याच्या परिवाराने रेबीज इंजेक्शन घेण्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी चार महिन्यानंतर सदर युवक अचानक कुत्र्यासारखा भुंकू लागला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी त्याला भुत लागल्याचे सांगत मंदिरात बांधून ठेवले. याची माहिती मिळताच परिसरातील काही नागरिकांनी सदर युवकास तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र कछुआ येथे भरती केले, परंतू सदर युवकाच्या शरिरात रेबीज भिनल्याने त्याला पुढील उपचारासाठी वाराणसी येथे रेफर करण्यात आल्याची माहिती मिळाली.




