सीसीआय तर्फे जिल्ह्यात जिल्ह्यात साडेपाच लाख क्विंटल कापसाची खरेदी
खामगाव केंद्राकडे चार दिवसापासून शेतकऱ्यांची पाठ
खामगाव
सीसीआयच्या बुलडाणा जिल्ह्यातील ३० केंद्रांवर गत तीन महिन्याच्या कालावधीत पाच लाख ३७ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. त्यात खामगाव येथील केंद्रांवर एक लाख ८० हजार आठशे आठ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसातून एक लाख २६ हजार गाठी तयार करण्यात आले असल्याची माहिती समजली आहे, तर दुसरीकडे खामगाव येथील केंद्राकडे मागील चार दिवसापासून शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
जिल्हयात सध्या सर्वत्र कापूस खरेदी विक्री मोठया प्रमाणात होत आहे. त्या अनुशंगाने शासनाने कापासाचा दर देखील जाहिर केला आहे. असे असले तरीही या भागातील अनेक ठिकाणी सीसीआय पेक्षा खाजगी व्यापारी कापसाला १०० ते २०० रुपये अधिक भाव देत असल्याने शेतकरी आपला कापूस खाजगी व्यापाऱ्याच्या पारड्यात मोजून देत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. सीसीआयच्या खामगाव येथील खरेदी केंद्रावर २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी एकही शेतकरी आपला कापूस घेऊन या केंद्रांकडे फिरकलेला नाही, त्यामुळे या केंद्रावर शुकशुकाट असल्याचे चित्र आहे. महिन्यापूर्वी सी सी आय ची ऊस खरेदी केंद्र शेतकऱ्यांनी गजबजलेली दिसून येत होती व कापसाची आवकही मोठ्या प्रमाणात होती पण आजच्या घडीला जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर विपरीत परिस्थिती दिसून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
सीसीआय तर्फे यंदा ३ नोव्हेंबर पासून खामगाव येथे कापूस खरेदी ला आरंभ करण्यात आला होता. त्यावेळी सीसीआयने शेतकऱ्यांच्या कापसाला रुपये प्रति क्विंटल : ७,६०० ते ७,८५० इतका भाव देऊन कापसाची खरेदी केली होती. त्यावेळेस खाजगी व्यापारी कापसाला २०० ते ३०० रुपये कमी भाव देत असल्याने शेतकऱ्यांनी आपला कापूस सीसीआयच्या पारड्यात मोजून देत होते. कापसाची आवक वाढल्याने सी सी आय ने खामगाव येथील खरेदी केंद्रात टप्प्याटप्प्याने वाढ केली. अंकुर कोटेक्स, भारत ऍग्रो इंडस्ट्रीज, सुगोसा कॉटन, श्याम जीनिंग उद्योग, एल आर जिनिंग, कमल इंडस्ट्रीज, ओम शंकर ऍग्रो मिल व औदारिया जिनिंग या नऊ खरेदी केंद्रावर कापूस खरेदी करण्यात येत आहे. ३ नोव्हेंबर ते २७ जानेवारी या कालावधीत एक लाख ८० हजार आठशे आठ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. पण २८ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी एकाही शेतकऱ्याने आपला कापूस या केंद्रावर विक्रीसाठी आणला नाही.
सीसीआय आजच्या घडीला ७६०० ते ७८५० रुपये प्रति क्विंटल भाव देत आहे. तर खाजगी ७६९० ते ८०१० प्रति क्विंटल इतका भाव देत आहे. त्यामुळे शेतकरी आपला कापूस सीसीआय ऐवजी खाजगी व्यापाऱ्याच्या पारड्यात मोजून देत आहे. काही व्यापारी तर शेतकऱ्याला त्याच दिवशी नगदी पैसे पाहिजे असेल तर नगदी आणि ज्यांना नगदी पैशाची गरज नाही अशांना दोन ते तीन दिवसानंतरचा चेक दिवसानंतरचा चेक देत आहे. दुसरीकडे सीसीआयला कापूस विकला तर सात दिवस पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना वाट बघावी लागत आहे. ही शेतकरी खाजगी व्यापाऱ्याला कापूस विकण्यात पसंती देत आहे.
सीसीआयची जिल्ह्यातील खरेदी केंद्र
सीसीआयची बुलढाणा जिल्ह्यात आजच्या घडीला ३० खरेदी केंद्र आहेत. त्यामध्ये खामगाव : ९, शेगाव : १, नांदुरा : १, जळगाव जामोद : ३, मलकापूर : ७, चिखली : २, देऊळगाव मही व देऊळगाव राजा : ७ अशी केंद्र आहे. या केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात येत आहे पण गेल्या आठ ते दहा दिवसापासून खामगाव केंद्र वगळता उर्वरित केंद्रांवर बोटावर मोजण्या इतके शेतकरी आपला कापूस विक्रीचा आणत आहे
अशी आहेत खरेदीचे दर
सीसीआय दर : ७,६०० ते ७,८५० रुपये प्रतिक्विंटल
खाजगी व्यापारी दर : ७,६९० ते ८,०१० रुपये प्रतिक्विंटल
खामगावातील खाजगी व्यापारी : एकूण ५
खाजगी खरेदी (१ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी) : ६,८०० क्विंटल
सीसीआय खरेदी (फक्त खामगाव) : १,८०,०००+ क्विंटल
सीसीआय पेक्षा खाजगी व्यापाऱ्यांची खरेदी अल्प
खामगाव येथे कापसाची खरेदी करणारे पाच खाजगी व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनी एक नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या तीन महिन्याच्या कालावधीत केवळ सहा हजार आठशे क्विंटल कापसाची खरेदी केली आहे तर सीसीआयने तीन महिन्यात खामगाव येथील केंद्रावर एक लाख ८० हजार क्विंटल खाजगी व्यापारी व सीसीआयची खरेदीची आकडेवारी पाहता सी सी आय ने ही व्यापाऱ्यापेक्षा कैक पटीने अधिक खरेदी केली आहे.



