जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण जल्लोषात
मोताळा पंचायत समितीकडे सर्वसाधारण विजेतेपद तर चिखली उपविजेता

बुलडाणा :
स्थानीय जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्या खेळाडू व कलावंतांचा बक्षीस वितरण समारंभ जल्लोषात पार पडला. सांघिक व वैयक्तिक विविध क्रीडा प्रकारात मिळविलेल्या उल्लेखनीय यशाच्या पार्श्वभूमीवर मोताळा पंचायत समितीने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर चिखली पंचायत समिती या स्पर्धांमध्ये उपविजेता ठरले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या हस्ते हा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुविद्य पत्नी रिपिका खरात,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल अकाळ,रणजीत सिंह राजपूत, अन्य खातेप्रमुख व गटविकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या बक्षीस वितरण समारंभात विविध क्रीडा प्रकारात तसेच सांस्कृतिक प्रकारामध्ये वैयक्तिक व सांघिक अशा दोन्ही गटात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंचा तसेच संघांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.त्याचप्रमाणे या औचित्यावर बुलढाणा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोमलवाडी येथील सिद्धी विठ्ठल सोनोने या वीर बालिकेचा कळसुबाई शिखर तसेच उत्तराखंड मधील केदारकंठा ही अवघड शिखरे अतिशय लहान वयात सर केल्या बद्दल प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी केले तर सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे व किरण वाघमारे यांनी पार पाडले. समारोपाच्या अखेरीस माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.




