आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत लोणारच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी

लोणार
नेपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत लोणारच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदकांची कमाई केली.
इंडो-नेपाल चॅम्पियनशिप 2026” ही स्पर्धा 16 व 17 मे रोजी मायादेवी नगरपालिका, नवलिंबुणी (नेपाळ) येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत भारतासह नेपाळ, भूतान, श्रीलंका आदी देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत लोणारच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गटात उत्कृष्ट प्रदर्शन करत गोल्ड मेडल पटकावले. यामध्ये एकांत कुमार संतोष राठोड, सोहम संतोष जाधव, मेहुल रवींद्र ठाकूर, भूमिका उमेश सानप, समीक्षा जितेंद्र झिने, साची मंगेश नागापुरे व चंचल वासुदेव दाते या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिस्पर्धी देशांच्या खेळाडूंवर मात करत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला.
महाराणा तायक्वांदो अकॅडमी, लोणार येथे प्रशिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश संपादन केले. त्यांच्या या यशामुळे लोणार, बुलढाणा जिल्हा तसेच महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे. या विद्यार्थ्यांना मुख्य कराटे प्रशिक्षक संतोष जाधव, चंचल दाते व आर्यन वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.



