स्नॅपचॅटवरून ब्लॅकमेलिंगला कंटाळून आठवीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
अल्पवयीन मैत्रीण व अन्य दोघांविरुद्ध गुन्ह

अंबाजोगाई
स्नॅपचॅटवरील कथित ब्लॅकमेलिंग, धमक्या आणि सततच्या मानसिक छळाला कंटाळून इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी एका अल्पवयीन मैत्रिणीसह अन्य दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
रिद्धी अशोक चाटे (वय १४) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून २४ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सर्वजण अल्पवयीन असल्याने त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी रिद्धीची आई नाईट ड्युटी संपवून घरी आल्यानंतर नातेवाइकांच्या लग्नासाठी धारूरला गेली होती. दुपारी रिद्धीने वडिलांकडे आईस्क्रीम खाण्याची इच्छा व्यक्त केली. वडील आईस्क्रीम आणण्यासाठी बाहेर गेले. अवघ्या १० ते १५ मिनिटांत ते परत आले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. संशय आल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रिद्धीने ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
सुरुवातीला आत्महत्येचे कारण स्पष्ट होत नव्हते. मात्र, तपासादरम्यान विद्यार्थिनीच्या मामांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ती एका अल्पवयीन मैत्रिणीच्या घरी गेल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधित मैत्रिणीने रिद्धीला वापरण्यासाठी लातूरहून आणलेला एक मोबाईल दिला होता. त्या मोबाईलमधील सिमकार्ड दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाचे असल्याचेही निष्पन्न झाले. घटनेनंतर भीतीपोटी हा मोबाईल कचऱ्यात फेकण्यात आल्याचा आरोप असून, तो फुटलेल्या अवस्थेत मिळाल्याची माहिती समोर आली आहे. स्नॅपचॅटवरील काही वैयक्तिक व्हिडिओंच्या आधारे विद्यार्थिनीला तिच्याच मैत्रिणीकडून वारंवार ब्लॅकमेल करण्यात येत होते. हे व्हिडिओ तिच्या पालकांना पाठविण्याची धमकी दिली जात असल्याने ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती. याशिवाय एका अन्य अल्पवयीन मुलाकडूनही तिला सतत फोन करून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे बदनामीच्या भीतीतून तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीसह दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
सोशल मीडियाचा गैरवापर ठरतोय धोकादायक
स्नॅपचॅटसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक फोटो, व्हिडिओ किंवा माहितीचा गैरवापर करून ब्लॅकमेलिंगच्या घटना वाढत आहेत. अशा प्रकारची धमकी किंवा मानसिक छळ सहन करण्याऐवजी पालक, शिक्षक किंवा पोलिसांशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जाते.
000



