विद्यार्थ्यांनो जिद्द व परिश्रम ठेवा यश नक्की मिळेल – प्रा. सुनील सपकाळ
श्री शिवाजी मध्ये स्व. सखाराम जाधव स्मृतिदिनी व्याख्यान

बुलडाणा
विद्यार्थ्यांनो मोठी स्वप्न पहा, स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द व परिश्रमाची जोड द्या, असे केल्यास यश नक्की मिळेल.परिश्रम असेल तर यशाला गवसणी घालणं दूर नाही, या प्रयत्नातून तुम्हाला नक्कीच यश मिळेल असे प्रतिपादन प्रा. सुनील सपकाळ यांनी केले.
ते, श्री शिवाजी विद्यालय हातेडी येथे स्वर्गीय सखाराम जाधव यांच्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते. सदर कार्यक्रम नुकतेच पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अँड भोंडे होते. जिजाऊ अर्बन चे शिवाजीराव तायडे, गजानन राऊत, अशोकराव पाटील, सत्यजित राऊत, सुभाष जाधव, गोपाळराव जाधव, सरपंच श्रीकांत जाधव ,बबनराव जाधव, प्रशांत गाडे,मुख्याध्यापिका अनुपमा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री शिवाजी विद्यालय हातेडी साठी जमीन संपादन करून विद्यालयाची उभारणी करणारे व सलग वीस वर्ष सरपंच राहिलेले स्वर्गीय सखाराम जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेल्या वीस वर्षापासून विविध कार्यक्रम या परिसरात घेतले जातात. त्या अनुशंगान सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
पुढे बोलताना प्रा.सपकाळ म्हणाले,डॉ. पंजाबराव देशमुख, पंढरीनाथ पाटील यांनी बहुजनांना शिक्षण उपलब्ध करून दिले. विदर्भामध्ये याचा मोठा फायदा समाजाला झाला आहे. ग्रामीण भागात मराठी शाळेत शिकलेला विद्यार्थी देखील सातसमुद्रा पार जाऊ शकतो हा आत्मविश्वास महापुरुषांच्या प्रयत्नाने बळावला. शिक्षक पंखात बळ देण्याचे काम करत असतात परंतु झेप घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांना विकसित करावी लागते. आपण ससा आणि कासवाच्या गोष्टीप्रमाणे कासवाने जशी जिद्द सोडली नाही तशी जिद्द देखील शिक्षणामध्ये ठेवली पाहिजे. असे सांगून विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणे हसत खेळत संवाद साधला. कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
00




