नवोदय मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थांशी साधला संवाद; खानावळीत घेतले भोजन
शिक्षक दिनी नवोदयच्या विद्यार्थ्यांमध्ये रमले जिल्हाधिकारी

प्रतिनिधी | शेगाव,
शिक्षक दिनाचे औचित्य साधून पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, शेगाव येथे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार देवरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. वर्गात विद्यार्थ्यांसोबत बसून अध्यापन प्रक्रियेची माहिती घेतानाच त्यांनी विद्यालयातील विविध सुविधांची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा, संशोधनवृत्ती व विविध क्षेत्रांतील कामगिरीचे कौतुक केले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांसोबत भोजन घेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी अधिक आत्मीयतेने संवाद साधला.
शिक्षक दिनानिमित्त इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका स्वीकारत कनिष्ठ विद्यार्थ्यांना अध्यापन केले. याच उपक्रमाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी देवरे यांनी विविध वर्गांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या बेंचवर बसून अध्यापन प्रक्रिया अनुभवली तसेच विद्यार्थ्यांशी शिक्षण, आवडी-निवडी आणि भविष्यातील ध्येयांबाबत संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांची संशोधनवृत्ती, जिज्ञासा आणि विविध स्पर्धांमध्ये मिळविलेल्या उल्लेखनीय यशाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, असे आवाहनही त्यांनी केले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यालयातील ग्रंथालय, वैद्यकीय कक्ष, समुपदेशन व करिअर मार्गदर्शन विभाग तसेच मेसची पाहणी केली. विद्यालयातील उपलब्ध सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी, खामगाव रामेश्वर पुरी, प्राचार्य कमलाकर धोपटे, उपप्राचार्य वैद्य, कार्यालयीन अधीक्षक शंकर बोकडे, जी. आर. गांगड, उज्ज्वल मुकावणे, मिलिंद जामनेकर, प्रभास कुमार, अतुल वैराट, कविता ठाकूर, पुष्पा सोनार, उमाशंकर यांच्यासह शिक्षक-शिक्षिका व कर्मचारीवृंद उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आनंद
विद्यालयाच्या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी देवरे यांनी विद्यार्थ्यांसोबत मेसमध्ये भोजन केले. अधिकाऱ्यांसोबत भोजन करताना विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. भोजनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी अनौपचारिक गप्पा मारत त्यांच्या अडचणी, अनुभव आणि विद्यालयीन जीवनाबाबत जाणून घेतले. या आत्मीय भेटीमुळे शिक्षक दिनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी विशेष ठरला.
बारावीचे विद्यार्थी बनले शिक्षक
शिक्षक दिनानिमित्त इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडत कनिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. वर्गातील विद्यार्थ्यांनीही आपल्या सहाध्यायांकडून शिकण्याचा अनुभव घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना आणि आत्मविश्वासाला अशा उपक्रमांमुळे चालना मिळत असल्याचे नमूद केले.




