आता बापाची इंट्री होणार – आ. संजय गायकवाड
धाडच्या दहिहांडी कार्यक्रमात आ. गायकवाड यांची गर्जना

बुलडाणा
चिखली मध्ये माझा गैरहजेरीत झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर बुलडाणा भाजपच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कोटयावधी रुपये खर्च करण्यात आले, तरीही बुलडाणेकरांनी या वाढदिवसाला पसंती दर्शवली नाही. या कार्यक्रमात मोठया प्रमाणात आयात झालेली मंडळी होती. याच कार्यक्रमात चिखलीच्या आ. श्वेता महाले यांनी बाप तो बाप रहेगा या गाण्यावर ताल धरला. खरा बाप कोण हे लवकरच कळणार कारण आता बापाची इंट्री होणार असल्याचे संकेत आ. संजय गायकवाड यांनी दिले.
ते, धाड येथे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात बोलत होते. सदर कार्यक्रम ८ सप्टेबरच्या सायंकाळी पार पडला. यावेळी कार्यक्रमात मृत्युंजय गायकवाड, रिजवान सौदागर यांच्यासह संभाजी मित्र मंडळचे पदाधिकाऱ्यासह धाड येथील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
मागील काही दिवसापासून बुलडाणा व चिखली मतदार संघाच्या आमदारात वाक्ययुध्द व शितयुध्द सुरु असल्याचे चित्र आहे. आ. गायकवाड यांच्या नेतृत्वात चिखली विधानसभेतील हजारो युवक शिवसेनेत सहभागी होत आहे. त्या पश्चात १५ ऑगस्ट रोजी चिखलीच्या मुख्य चौकात मृत्युंजय गायकवाड यांचा वाढदिवस मोठया धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाला प्रतिउत्तर देण्यासाठीच भाजपाच्यावतीने बुलडाणा मतदार संघात आ. श्वेता महाले यांचे पती विद्यासागर महाले यांचा वाढदिवस मोठया दणक्यात साजरा केला. या दरम्यान बुलडाण्याचा कचरा चिखलीत आला व बाप तो बाप रहेगा हे दोन विषय बुलडाण्यात मोठया प्रमाणात चर्चिल्या गेल्या. या कार्यक्रमाचे उत्तर देत आ. गायकवाड यांनी सांगितले की, मी स्वता चिखलीच्या कार्यक्रमात हजर नव्हतो तरी हा कार्यक्रम प्रचंड मोठा झाला. बुलडाण्याचा कचरा हा चिखली आला असे आ. महाले म्हणाले, हा कचरा नाही तर भगवे वादळ आहे हे सर्वश्रुत आहे. अजून या ठिकाणी बापाची इंट्री झाली नव्हती, आता बापाची इंट्री होईल असा इशारा ही आ. गायकवाड यांनी दिला. एवढेच नव्हे तर त्यांनी स्पष्ट केले की, आमचा संघर्ष तुमच्याशी नाही, विनाकारण आमच्याशी संघर्ष करण्याचा प्रयत्न करु नका, तुम्ही तुमचा पक्ष वाढवा आम्ही आमचा पक्ष वाढवू असा सल्ला ही दिला.




