शेवगा बुद्रुकमध्ये स्मशानभूमीचा वाद चिघळला, ४० वर गुन्हा दाखल

जागेच्या वादातून दोन भिन्न समाजात जबर मारहाण; १२ जण गंभीर जखमी

| संग्रामपूर

तालुक्यातील शेवगा बुद्रुक येथे स्मशानभूमीच्या जागेवरून सुरू असलेल्या वादाने गुरुवारी १० सप्टेंबर रोजी सायंकाळी गंभीर वळण घेतले. जागेच्या वादातून दोन गट आमनेसामने आल्यानंतर त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. काठ्या, लाठ्या तसेच सिमेंटचे गट्टू वापरून झालेल्या मारहाणीत तब्बल १२ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर दोन्ही गटांनी तामगाव पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारी दाखल केल्या. त्यावरून पोलिसांनी एकूण ४० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
शेवगा बुद्रुक येथील स्मशानभूमीसाठी असलेल्या जागेच्या कारणावरून हिंदू व बौध्द या दोन समाजातील गटांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू असल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या वादातून दोन्ही बाजूंचे नागरिक आमनेसामने आले. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी काही जणांना काठ्या आणि सिमेंटच्या गट्टूने डोक्यावर, छातीवर, हातावर, खांद्यावर तसेच पाठीवर मारहाण केल्याचा आरोप पहिल्या गटाने तक्रारीत केला आहे. या संदर्भात अभिजीत विष्णू सोनोने यांनी दाखल केल ेल्या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, आरोपींनी त्यांच्यासह नातेवाईकांना मारहाण करून जखमी करण्यात आले. या घटनेदरम्यान त्यांच्या आतेभावाच्या पत्नीशी गैरवर्तन करून विनयभंग केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मारहाण, महिलेचा विनयभंग, जमाव करून गोंधळ घालणे आणि धमकी देणे या स्वरूपाचे आरोप या तक्रारीत करण्यात आले आहेत. या प्रकरणी विरोधी गटातील आरोपी आनंदा किसन डोंगरदिवे, विकी रमेश खंडेराव, आदित्य कैलास डोंगरदिवे, आकाश कैलास डोंगरदिवे, प्रकाश किसन डोंगरदिवे, रमेश महादेव खंडेराव, गौतम राष्ट्रपाल वानखडे, सचिन देवीदास वानखडे, धम्मपाल किसन डोंगरदिवे आदी ११ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याच घटनेच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या गटानेही सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांत तक्रार दाखल केली. प्रकाश किसन डोंगरदिवे यांच्या तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तींनी एकत्र येत काठ्या-लाठ्यांसह जमाव केला आणि फिर्यादीसह त्यांच्या नातेवाईकांना मारहाण केली. आरोपींनी जातीच्या आधारावर अपमानास्पद भाषा वापरून शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मारहाण, जमाव करून हल्ला, धमकी तसेच अनुसूचित जाती-जमातीतील व्यक्तीचा जातीय आधारावर अपमान केल्याच्या आरोपांशी संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार आरोपी गणेश मधुकर पिवतकार, गजानन मधुकर पिवतकार, निंबाजी आडे वय, ओम निंबाजी आडे, मधुकर मेनकार, हर्ष मधुकर मेनकर, शुभम विष्णु सोनोने, मनोज विष्णु सोनोने, अभिजीत विष्णु सोनोने, भगवान गोपाळ सोनोने आदी १० विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी पहिल्या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज वासाडे करीत आहेत, तर दुसऱ्या प्रकरणाचा तपास मलकापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहम माछरे करीत आहेत.

हाणामारीत १२ जण गंभीर जखमी
दरम्यान दोन गटात झालेल्या हाणामारीत दोन्ही कडील सुमारे १२ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. या जखमींना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे.

गावाला पोलिस छावणीचे स्वरुप
शेवगा बुद्रुक येथील स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गटांत झालेल्या वादानंतर गावातील वातावरण तणावपूर्ण बनले. परिस्थिती आणखी चिघळू नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तामगाव पोलिस प्रशासनाच्यावतीने गावात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे गावाला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा पहारा कायम ठेवण्यात आला असून, संवेदनशील ठिकाणी पोलिसांकडून गस्तही वाढविण्यात आली. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!