भगवान चक्रधर स्वामींचे समता, अहिंसा व मानवतेचे विचार आजही प्रेरणादायी

— प्रा. शिवशंकर मोरे

लोणार 

भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी समाजाला दिलेला समता, अहिंसा, मानवता आणि बंधुभावाचा संदेश आजच्या काळातही तितकाच मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन प्रा. शिवशंकर मोरे यांनी केले.

ते, अमृत सेवाभावी संस्था, परभणीद्वारा संचालित कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय आणि कै. कमलाबाई बनमेरू महिला महाविद्यालय, लोणार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यानात मार्गदर्शन करत होते. सदर कार्यक्रम भाद्रपद शुद्ध द्वितीयेनिमित्त पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतोष बनमेरू होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय समन्वयक डॉ. कमलाकर वाव्हळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रसायनशास्त्र विभागाचे प्रा. शिवशंकर मोरे यांनी भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनकार्य व तत्त्वज्ञानावर मार्गदर्शन केले.

प्रा. मोरे यांनी सांगितले की, बाराव्या शतकातील सामाजिक परिस्थितीत विषमता, अंधश्रद्धा आणि भेदभावाचे वातावरण असताना श्री चक्रधर स्वामी यांनी सत्य, अहिंसा, मानवता आणि समानतेची शिकवण समाजासमोर मांडली. स्त्री-पुरुष समानता, अस्पृश्यता निर्मूलन, बंधुभाव आणि सर्व मानवांप्रती समानतेची भावना या मूल्यांना त्यांच्या विचारधारेत महत्त्वाचे स्थान होते.  महानुभाव पंथाच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाला दिशा दिली. त्यांच्या मानवतावादी विचारांमुळे वंचित घटकांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळाली. तसेच मराठी साहित्याच्या विकासातही त्यांच्या विचारांचा आणि महानुभाव परंपरेचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे प्रा. मोरे यांनी नमूद केले.  अध्यक्षीय मनोगतात डॉ. संतोष बनमेरू यांनी श्री चक्रधर स्वामींच्या विचारांचे आजच्या समाजजीवनातील महत्त्व स्पष्ट केले. महापुरुषांच्या विचारांचा केवळ अभ्यास न करता ते प्रत्यक्ष आचरणात आणण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. महेंद्र भिसे, स्वयंसेवक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना समता, अहिंसा, मानवता आणि सामाजिक सलोख्याच्या मूल्यांची जाणीव करून देत कार्यक्रमाचा समारोप झाला.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!