सरोवराच्या वाढत्या पाण्यामुळे मंदिर पाण्याखाली; कमळजा माता मंदिरासाठी भक्तांचा आक्रोश

२१ सप्टेंबरला प्रशासनाची तातडीची बैठक

लोणार
जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या वाढत्या पाणी पातळीमुळे ऐतिहासिक व धार्मिक वारशावर निर्माण झालेल्या संकटाची गंभीर दखल घेत कमळजा माता भक्तांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. सरोवरातील वाढत्या पाण्यामुळे मंदिर पाण्याखाली गेलेल्या श्री कमळजा माता मंदिराचे तातडीने संरक्षण करून मंदिर पाण्याच्या बाहेर काढण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी भाविकांच्यावतीने करण्यात आली. या मागणीसाठी भाविकांनी तहसीलदार भूषण पाटील यांच्या माध्यमातून शासनाला निवेदन सादर केले आहे.
लोणार सरोवराची पाणीपातळी सातत्याने वाढत असल्याने सरोवर परिसरातील प्राचीन मंदिरे तसेच नैसर्गिक अधिवासावर त्याचा परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. त्यातच कमळजा माता मंदिरातील देवीच्या मुखापर्यंत पाणी पोहोचल्याने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. कमळजा माता हे लोणार शहरासह परिसरातील अनेक कुटुंबांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असल्याने हा प्रश्न केवळ एका मंदिरापुरता मर्यादित नसून तो नागरिकांच्या धार्मिक भावना, ऐतिहासिक वारसा आणि श्रद्धेशी निगडित असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. भाविकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात कोणत्याही प्रकारची केवळ आश्वासने किंवा चर्चा नको, तर कायदेशीर, तांत्रिक आणि पर्यावरणीय बाबींचा विचार करून प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करावा आणि कामाला सुरुवात करावी, अशी ठाम भूमिका मांडली आहे. मंदिराच्या संरक्षणासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, लोणार सरोवर विकास समिती, वन विभाग, स्थानिक प्रशासन तसेच स्थानिक भाविक व भक्त प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन मंदिराच्या संरक्षणासाठी वेळमर्यादेसह ठोस निर्णय घेण्याची मागणी ही निवेदनातून करण्यात आली आहे.

तहसीलदारांकडून तातडीची बैठक; विविध विभागांना उपस्थितीचे आदेश
भाविकांच्या निवेदनानंतर तहसीलदार भूषण पाटील यांनी १६ सप्टेंबर रोजी संबंधित विभागांना पत्र काढून २१ सप्टेबर रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस गटविकास अधिकारी पंचायत समिती लोणार, मुख्याधिकारी नगर परिषद लोणार, पोलीस निरीक्षक लोणार, भारतीय पुरातत्त्व विभागाचे संबंधित अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी लोणार वन्यजीव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आदी अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी कोणता ठोस मार्ग काढता येईल, यावर चर्चा होणार आहे.

सरोवराच्या बरोबरच वन्यजीव अधिवासाचीही चिंता
सरोवरातील पाणीपातळी आणखी वाढल्यास लगतच्या जंगलाचा अधिवास कमी होण्याची शक्यता असून, त्यामुळे कोल्हे, तडस, साळींदर, बिबटे यांसह अन्य वन्यजीव मानवी वस्त्यांकडे वळण्याचा धोका वाढू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर सरोवरातील पाण्याचा पीएच स्तर व क्षारांचे गुणधर्म बदलल्यास लोणारच्या वैशिष्ट्यपूर्ण अल्कधर्मी परिसंस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

नवरात्राच्या तोंडावर भाविकांच्या नजरा बैठकीकडे
नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना कमळजा माता मंदिर पाण्याच्या विळख्यात असल्याने लोणार व परिसरातील भाविकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे २१ सप्टेंबरच्या बैठकीत केवळ चर्चा न होता मंदिराच्या संरक्षणासाठी प्रत्यक्ष कृतीचा निर्णय होऊन कामाला सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!