नाशिकमध्ये महापौर भाजपचा होणार

नाशिक :

नाशिकच्या राजकारणात आज एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली. नाशिक महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला असून, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले हे दोन्ही पक्ष आता सत्तेत सहभागी होणार असून नाशिकवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. नाशिकमध्ये भाजपचा महापौर आणि शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर विराजमान होणार आहे. या सत्तासमीकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणि राज ठाकरेंच्या मनसेने देखील भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेत भाजप, शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि मनसे अशा चार पक्षांची महासत्ता पाहायला मिळणार आहे.

दुसरीकडे, संख्याबळ नसल्याने ठाकरेंच्या शिवसेनेने महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे, ज्यामुळे आता नाशिकला हिमगौरी आडके यांच्या रूपाने भाजपचा महापौर आणि विलास शिंदे यांच्या रूपाने शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर बिनविरोध मिळणार आहे. आज सकाळी महापालिकेत निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, भाजपचे नगरसेवक मोठ्या उत्साहात दाखल होत आहेत. विशेषतः भाजपच्या महिला नगरसेविकांनी पारंपरिक पोशाख आणि भगवे फेटे परिधान करून महापालिकेत प्रवेश केला, ज्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेने माघार घेतल्यामुळे त्यांचा ‘विरोधी पक्षनेता’ होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. थोड्याच वेळात नाशिकला नवीन महापौर आणि उपमहापौर अधिकृतपणे मिळणार आहेत.

गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेली प्रशासकीय राजवट अखेर आज संपुष्टात येत असून, नाशिकला नवा लोकनियुक्त महापौर आणि उपमहापौर मिळणार आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी महापालिकेच्या सभागृहाचे रूप पूर्णपणे पालटले आहे. नूतनीकरण केलेली आसनव्यवस्था, आकर्षक रंगरंगोटी आणि फुलांच्या सजावटीसह सभागृहाला एखाद्या वधूसारखा नवा साज देण्यात आला आहे. पुढच्या काही तासांतच नवीन महापौरांच्या निवडीची औपचारिक प्रक्रिया पार पडणार असून, या सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने चोख तयारी केली आहे. चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नाशिकचा कारभार पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या हातात जाणार असल्याने नाशिककरांमध्ये आणि राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात नव्या महापौरांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असून त्यानंतर नाशिकमध्ये ‘महायुती’चा जल्लोष पाहायला मिळेल.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!