शेतातून हुमणी अळी होणार हद्दपार! कृषी विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

गोरेगाव,
पावसाळ्याच्या सुरुवातीला पिकांवर मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या हुमणी आळीच्या नियंत्रणासाठी विवेकानंद कृषी महाविद्यालय, हिवरा आश्रम येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांना एकात्मिक नियंत्रणाचे प्रात्यक्षिक दिले. ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ (RAWE) कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
हुमणी आळीचा प्रादुर्भाव वाढल्यास ऊस, भुईमूग, सोयाबीन आणि हळद यांसारख्या नगदी पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांना या किडीची ओळख, तिचा जीवनक्रम आणि नियंत्रणाचे प्रभावी उपाय समजावून सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रकाश सापळ्यांच्या माध्यमातून हुमणीचे भुंगेरे पकडण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. पहिल्या पावसानंतर संध्याकाळच्या वेळी जमिनीतून बाहेर पडणाऱ्या भुंग्यांचा नाश करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बाभूळ, कडूनिंब आणि बोर यांसारख्या झाडांवर रात्रीच्या वेळी हे भुंगेरे मोठ्या प्रमाणावर जमा होत असल्याने त्या झाडांच्या फांद्या हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करण्याचा सल्ला देण्यात आला. रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेक टाळण्यासाठी ‘मेटारायझियम ॲनिसोप्ली’ आणि ‘ब्युव्हेरिया बासियाना’ या जैविक बुरशींचा वापर कसा करावा, याबाबतही विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती दिली. याशिवाय उन्हाळ्यात खोल नांगरट करून आळ्यांचा नाश करणे आणि शेतात चांगले कुजलेले शेणखत वापरण्याचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी सोप्या भाषेत आणि प्रत्यक्ष साहित्याच्या साहाय्याने दिलेल्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमात गावातील अनेक प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
या उपक्रमात विद्यार्थी श्याम बोडखे, चेतन बुरंगे, लखन चांडक, गणेश भुसारी आणि करण शिंदे यांनी सहभाग घेतला. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य कालवे सर तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. खोडके सर, समाधान सर, डॉ. सोळंकी सर आणि काकडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.




