‘एसआयआर’च्या आड सायबर भामट्यांचे जाळे!

कागदपत्रांत त्रुटी असल्याचे सांगून मतदारांना संपर्काचे आवाहन; अनोळखी लिंकपासून सावध राहण्याच्या प्रशासनाच्या सुचना

बुलढाणा

 

विशेष सखोल मतदारयादी पुनरीक्षणाचा (एसआयआर) आधार घेत सायबर भामट्यांनी नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मतदारांच्या कागदपत्रांत विसंगती असल्याचे भासविणारे तसेच निवडणूक अधिकाऱ्याशी तातडीने संपर्क साधण्यास सांगणारे बनावट संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. अशा संदेशांतील लिंकवर क्लिक करू नये आणि कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.

मतदारयादीतील नोंदी अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत मृत किंवा स्थलांतरित मतदार तसेच एकापेक्षा अधिक ठिकाणी नाव असलेल्या व्यक्तींच्या नोंदींची पडताळणी केली जाते. वैधानिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अपात्र नावे वगळली जातात; तर १८ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र नागरिकांना नावनोंदणीची संधी दिली जाते. या प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेट देऊन गणती प्रपत्र आणि मतदारांची माहिती पडताळतात. मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) दावे व हरकतींवर निर्णय घेण्यासह नाव समाविष्ट अथवा वगळण्याची वैधानिक कार्यवाही करतात. त्यामुळे कागदपत्रांबाबत शंका असल्यास अनोळखी क्रमांकावरील संदेशावर विश्वास न ठेवता संबंधित बीएलओ किंवा ईआरओकडूनच खात्री करावी. सुधारित वेळापत्रकानुसार घरोघरी माहिती संकलन ८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मसुदा मतदारयादी १७ ऑगस्टला प्रसिद्ध होईल. त्यावर १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबरदरम्यान दावे आणि हरकती नोंदविता येतील. अंतिम मतदारयादी १९ ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे.

 

–संदेश आला तर काय कराल?–

अनोळखी लिंक उघडू नका; ओटीपी, आधार क्रमांक, बँक तपशील किंवा इतर वैयक्तिक माहिती देऊ नका. संदेशाची सत्यता स्थानिक बीएलओ, ईआरओ किंवा निवडणूक आयोगाच्या १९५० या मदतवाहिनीवर तपासावी.

 

एसआयआर अधिकृत बीएलओ कडून करावी

“एसआयआरच्या नावाने प्रसारित होणारा संबंधित संदेश बनावट आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद संदेश अथवा दुव्यावर क्लिक करू नये. माहितीची खात्री केवळ अधिकृत बीएलओ किंवा ईआरओकडून करावी.”

— सुहासिनी गोणेवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक), बुलढाणा

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!