श्रीक्षेत्र धानोरा नगरीत भाविकांची गर्दी; हजारोंनी घेतला महाप्रसाद

प्रतिनिधी | जळगाव जामोद
तालुक्यातील श्रीक्षेत्र धानोरा येथील महासिद्ध महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त शनिवार, १ फेब्रुवारी रोजी भाविकांची अलोट गर्दी उसळली. यात्रेमुळे संपूर्ण धानोरा गाव व परिसर भक्तीमय वातावरणाने गजबजून गेला. पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही माघ शुद्ध दांडी पौर्णिमेनिमित्त महासिद्ध महाराजांच्या यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला. या यात्रा महोत्सवाची सुरुवात २५ जानेवारीपासून ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकीर्तन सप्ताहाने झाली होती. सप्ताहाची सांगता १ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. श्री. बाजीराव महाराज (एलोरा) यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. दरम्यान ३१ जानेवारी रोजी रात्री १२ वाजता ‘श्रीं’ची महापूजा व आरती करण्यात आली. यानंतर स्थानिक महिलांकडून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. यात्रेच्या दिवशी सकाळी टाळ-मृदंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात पालखीमध्ये श्रींच्या प्रतिमा व पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर काल्याचे कीर्तन झाले. दुपारी १२ वाजता श्री महासिद्ध महाराजांची महाआरती झाली व त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. डफड्याच्या निनादात मोरपिस घेऊन नाचत ‘कुंभाराचा आवा लुटणे’ यासह विविध पारंपरिक कार्यक्रमांनी यात्रेची रंगत वाढली.
यात्रेदरम्यान कटलरी, हॉटेल्स, स्टेशनरी, आकाशपाळणे, तांबे-पितळ भांडी, मातीची भांडी (राजन माठ) तसेच संसारोपयोगी वस्तूंची दुकाने भाविकांचे विशेष आकर्षण ठरली. यात्रेकरूंच्या सोयीसाठी जळगाव जामोद आगाराकडून विशेष बसफेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच खाजगी वाहनांद्वारेही मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झाले.

महोत्सवात झाले भक्तीमय वातावरण
नामसंकीर्तन सप्ताहातील कीर्तन, हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि पालखी मिरवणुकीमुळे संपूर्ण श्रीक्षेत्र धानोरा नगरी भक्तीमय झाली होती. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महासिद्ध महाराजांच्या चरणी नतमस्तक होत श्रद्धेची अनुभूती घेतली. कीर्तन, आरती व महाप्रसादाच्या माध्यमातून संपूर्ण महोत्सव भक्ती, शांती आणि परंपरेच्या वातावरणात पार पडला. यावेळी नामसंकीर्तन सप्ताहात ह.भ.प. संतोष महाराज, बाजीराव महाराज, गणेश महाराज, महादेव महाराज, शंकर महाराज (धामणगाव), गजानन महाराज (खरप) व हरिओम महाराज यांच्या प्रभावी कीर्तनांनी भक्तीमय वातावरण निर्माण झाले. यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जळगाव पोलिस स्टेशनकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आ. कुटे यांनी केले कौतुक
दरम्यान आमदार संजय कुटे यांनी श्रीक्षेत्र धानोरा येथील श्री महासिद्ध संस्थानास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी महासिद्ध महाराजांचे विधिवत दर्शन घेतले. त्यानंतर संस्थानाच्या विश्वस्त मंडळाशी संवाद साधत संस्थानामार्फत राबविण्यात येणाऱ्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली. यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी संस्थान विश्वस्त मंडळाचे अभिनंदन केले व भाविकांच्या सोयीसुविधांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!