रोहणा येथे कुष्ठरोग ‘स्पर्श’ अभियानांतर्गत जनजागृती

बुलढाणा,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या “अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान” तसेच ‘कुसुम – कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (स्पर्श)’ अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, रोहणा येथे नागरिकांची तपासणी, समुपदेशन व व्यापक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी शिरोडकर यांनी सिकलसेल तपासणीचे महत्त्व विशद केले. तसेच कुष्ठरोगाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून ‘स्पर्श’ अभियानाची उद्दिष्टे नागरिकांना समजावून सांगितली. वेळेवर तपासणी करून घेणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी धुताडमल यांनी मार्गदर्शन करताना ० ते ४० वर्षे वयोगटातील सर्व स्त्री-पुरुषांनी सिकलसेल तपासणी करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. विशेषतः विवाहपूर्व सिकलसेल तपासणी करून घेणे महत्त्वाचे असून, त्यामुळे भविष्यातील आरोग्यविषयक धोके टाळता येऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये डॉ. एस. एल. शिराळकर (आयुर्वेदिक दवाखाना, वर्णा), वि. टी. माळे (LHV), वी. स. खाडे (AMM), एस. बी. भीमेवाल (AMM), परिमल उंदरे (MPW), जी. एस. लोड (परिचर), एस. डी. देशमुख (परिचर) यांचा सहभाग होता. तसेच ग्रामस्थांमधून अविनाश महाले (रोहणा), शामराव शास्त्री (वाघेरा), पांडुरंग शेळके आदी उपस्थित होते.




