आयुष जागतिक आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

दुबईतील आंतरराष्ट्रीय आयुष परिषद व प्रदर्शनीचे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

दिल्ली | प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारत पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक आरोग्य व्यवस्थेच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे. या प्रयत्नामुळेच आयुष ही केवळ राष्ट्रीय पातळीपुरती मर्यादित राहिलेली प्रणाली नसून, ती आता जागतिक आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक बनली आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
ते, दुबई येथे आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय आयुष परिषद व प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या प्रदर्शनी व परिषदेचे उदघाटन भारताचे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते रविवारी १५ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडले. यावेळी कार्यक्रमात संयुक्त अरब अमिरातीतील भारताचे राजदूत डॉ. दीपक मित्तल, दुबई हेल्थ ऑथॉरिटीचे महासंचालक डॉ. अल्वी अलशेख अली, दुबईतील भारताचे कॉन्सुल जनरल सतीश कुमार सिवान तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. ईसा एम. फतकी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, आयुर्वेद, योग, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी या पारंपरिक उपचार पद्धतींच्या जागतिक प्रसारात भारताची भूमिका महत्त्वपूर्ण असून आयुष हा आज जागतिक प्रतिबंधात्मक आरोग्य धोरणाचा एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून उदयास येत आहे. आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नसून, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समतोलाची अवस्था आहे. निसर्गाशी संतुलन राखत आयुष पद्धती हे संतुलन साध्य करण्यास मदत करतात, आयुष पद्धती जागतिक आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा स्तंभ बनत असून, प्रतिबंधात्मक आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवेत त्याचे योगदान वाढत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
या परिषदेत “मन आणि शरीराच्या आरोग्यासाठी आयुष उपचार” या विषयावर मसुदा श्वेतपत्रावर चर्चा होत असून, याचा उद्देश आयुष उपचारांची वैज्ञानिक व पुराव्याधारित मांडणी करणे हा आहे. अंतिम स्वरूप दिल्यानंतर हे श्वेतपत्र जागतिक आरोग्य धोरणासाठी महत्त्वाचे मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युरोपियन युनियन आणि अमेरिकेसोबतच्या मुक्त व्यापार करारामुळे आयुष उत्पादने, सेवा, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होत आहेत. त्यासाठी गुणवत्ता मानके आणि जागतिक प्रमाणन अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!